जयपूर – राजस्थानमधील काँग्रेस सरकारमधील राजकीय संग्राम थांबण्याचे नाव घेत नाहीये. आधी सचिन पायलट यांच्या नाराजीनाट्यानंतर आता काँग्रेस आमदार वेदप्रसाद सोलंकी यांनी पायलट समर्थक आमदारांचे फोन टॅप करण्याचा आरोप लावला आहे. त्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे जाळ्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. या आरोपानंतर राजस्थानमध्ये राजकीय भूकंप आला आहे.
सचिन पायलट समर्थक आमदार वेदप्रकाश सोलंकी सांगतात, आमच्या दोन-तीन आमदारांचे फोन टॅप होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. सीआयडीचे लोक आमच्या घरी सारखे येत आहेत. तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवू असे अधिकारी आम्हाला धमकावत आहेत. अनेक अधिकारी आमच्या आमदारांना एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकविण्याची भीती दाखवून बदनामीच करण्याची धमकी देत आहेत.
फोन टॅपिंगवरून काही आमदरांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे तक्रार केली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आमदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे. आमदारांवर दबाव वाढविण्यासाठी असे करण्यात येत आहे, असा आरोप सोलंकी यांनी केला आहे.
सचिन पायलट समर्थकांकडून गेल्या वर्षी जुलैत बंड पुकारल्यादरम्यान फोन टॅपिंगचे आरोप लावले होते. भाजपने गेहलोत सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप लावले होते. या मुद्द्यावरून चांगलेच राजकीय द्वंद्व पाहायला मिळाले. गेहलोत समर्थकांनी गेल्या वर्षी जुलैत घोडेबाजार झाल्याचा आरोप करून काही व्हिडिओ प्रसारित केले होते. सरकारकडून बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप भाजपने केला होता.
वेदप्रकाश सोलंकी यांनी फोन टॅपिंगचे आरोप केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट करून गेहलोत सरकारवर निशाणा साधला आहे. पुनिया ट्विटमध्ये म्हणतात, आज पुन्हा काँग्रेसचे एक आमदार म्हणत आहेत की, त्यांचे फोन टॅप होत आहेत. पाळत ठेवली जात आहे. हे आमदार कोण आहेत, याचा खुलासा काँग्रेसने करावा. सो जा बेटा गब्बर आ जाएगा या संवादानुसार, काँग्रेस आपल्याच आमदारांना भीती दाखवत आहे. गब्बर कधी येणार, हे काँग्रेसने सांगावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.