नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोदी सरकारने काही राजकीय डावपेच चुकल्यामुळे कर्नाटकसारखी राज्ये हातून गमावली. राजस्थानमध्ये ही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण वसुंधरा राजेंना नाराज करून भाजपने नवी डोकेदुखी ओढवून घेतली आहे.
यावर्षीच्या अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक आहे. कर्नाटकमधील पराभवापासून धडा घेऊन छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पण त्याचवेळी वसुंधरा राजेंना भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या भूमिकेपासून वंचित ठेवले गेले. वसुंधरा राजेंना एकीकडे राष्ट्रीय राजकारणात आणण्याचे आमिष दाखवून राज्यातून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती व व्यवस्थापन समिती भाजपने अलीकडेच जाहीर केली. यात वुसंधरा राजेंना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या आणि थेट दिल्ली गाठले.
दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ अद्याप त्यांना मिळालेली नाही. वसुंधरा राजे दोनवेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे त्यांचे राज्यातील वजन कुणालाही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे नेतृत्वबदलाची चूक राजस्थानमध्ये केली तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानमध्ये सातत्याने सत्ताबदल होत असतो. सध्या अशोक गहलोत यांचे सरकार आहे. या सरकारने बऱ्याच कल्याणकारी योजना राबवून जनतेची पसंती मिळवली आहे. पण त्यावर मात करायची असेल तर भाजपला सक्षम नेतृत्वाची गरज असेल. आणि त्यासाठी वसुंधरा राजेंच्या व्यतिरिक्त दुसरे नेतृत्व नाही, हेही स्पष्ट आहे.
शहांनी जुनी चूक आठवून दिली
यापूर्वीच्या निवडणुकीत वसुंधरा राजेंनी विधानसभेच्या चाळीस जागांवर आपल्या पसंतीचे उमेदवार उभे केले होते. पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरून त्यांनी हे काम करून घेतले. पण, त्यातील एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे मोदी आणि शहांनी नाराजीही व्यक्त केली होती. ही चूक अमित शहांनी अलीकडच्याच भेटीत वसुंधरा राजेंना आठवून दिली.
Rajasthan Politics BJP Vasundhara Raje Dilemma