इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – : राजस्थानमधील कोटा येथे नीटची तयारी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील अविष्कार कासले (१७ वर्षे) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. अविष्कारने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उजना गावातल्या सगळ्यांनाच धक्का बसला असून आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही.
अविष्कारने जेव्हा उडी मारल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात रुग्णवाहिका पोहचण्याआधीच अविष्कारने जीव सोडला. अविष्कारने आत्महत्या केल्याची माहिती मिळातच त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला. आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा अविष्कारचा मृतदेह त्याच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. अविष्कारचे आई आणि वडील हे दोघंही शिक्षक आहेत. अहमदपूरमध्ये ते वास्तव्य करतात. यांचा मोठा मुलगा आणि अविष्कारचा मोठा भाऊ हैदराबादमध्ये शिक्षण घेतो. मोठ्या मुलाचं शिक्षणही कोटामधून पूर्ण झाले. त्यानंतर अविष्कारही कोटा या ठिकाणी शिक्षणासाठी गेला होता. अविष्कारने आत्महत्या का केली, हे अद्याप समोर आलेले नाही. अविष्कारने दुपारी ३.१५ च्या सुमारास जवाहर नगर कोचिंग क्लासच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.
अन्य एका विद्यार्थ्याची आत्महत्या
अविष्कारच्या आत्महत्येच्या चार तासानंतर कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आदर्श राज (१८ वर्षे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आदर्शने रविवारी संध्याकाळी सात वाजता कुन्हाडी येथील आपल्या घरात फाशी घेत आत्महत्या केली. आदर्शची बहीण आणि चुलत भाऊ संध्याकाळी साडेसात वाजता फ्लॅटवर पोहचले तर दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळी लटकलेल्या अवस्थेत होत्या. आदर्शला लगेच खाली उतरवण्यात आले परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याने प्राण सोडले.
जिल्हाधिकारी अलर्ट मोडवर
कोटामध्ये देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येतात. पण आता कोटाच्या सर्व कोचिंग क्लासेसमधील परीक्षा दोन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय.
वर्षभरात एवढ्या आत्महत्या
अभ्यासाच्या तणावाखाली येऊन विद्यार्थी नैराश्येत जातात. त्यामुळेच वर्षभरात कोटामध्ये २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
देशभरातून विद्यार्थी कोटामध्ये
नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी कोटामध्ये येत असतात. येथे खासगी कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट आहे. लाखो रुपये फी भरुन विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. निवासी स्वरुपाचीही व्यवस्था क्लासेसकडून केली जाते. गेल्या काही वर्षात कोटा येथील अर्थव्यवस्था नीट परीक्षा क्लासेसमुळे अधिक गतिमान झाली आहे.
Rajasthan Kota Student Suicide Cases Crime Neet Exam Classes
Medical Education Coaching Depression Exam Collector