इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला की त्याची काळजी घेणे हे त्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते. कारण त्याच्यावर योग्य उपचार करण्याचे त्यांना उपचार करण्याबद्दल त्यांना पैसे तथा पगार मिळत असतो. परंतु काही वेळा अनेक रुग्णालयांमध्ये निष्काळजीपणामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा प्रसंग देखील घडल्याचे दिसून येते. राजस्थानमध्ये देखील असाच एक भयानक प्रकार घडला आहे. कोटा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला आग लागल्यानंतर रुग्णाचा चेहरा आणि मान जळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कर्मचारी पळून गेले
कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात बुधवारी रात्री आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यानंतर डॉक्टर सीपीआर देत होते. यावेळी रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला करंट लागल्याने आग लागली आणि रुग्णाचा चेहरा व मान भाजले, या घटनेत त्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाच्या मास्कने पेट घेतल्यावर त्याला वाचवण्याऐवजी कर्मचारी आयसीयूमधून पळून गेले. दरम्यान, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आर.पी.मीना यांनी म्हटले की, हा एक प्रकारचा अपघात आहे. यात निष्काळजीपणा असे काही नाही. आम्ही बोर्डाकडून पोस्टमॉर्टम करून घेऊ. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या चौकशीत जे काही समोर येईल. त्यानुसार कारवाई केली जाईल.
पुन्हा आयसीयुमध्ये हलवले
अनंतपुरा तालाब गावात राहणारा वैभव ( वय ३० ) याला गेल्या एक महिन्यापासून सतत पोटदुखीचा त्रास होत होता. जवळच्या डॉक्टरांना दाखवूनही आराम न मिळाल्याने वैभवने वैद्यकीय महाविद्यालयातून उपचार घेणे सुरू केले. मात्र उपचार घेऊनही वैभवला आराम मिळत नसल्याने त्याला उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर त्यांला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र अचानक वैभवची प्रकृती ढासळू लागली. नातेवाईकांनी नर्सला बोलावले. त्यानंतर रुग्णाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला पुन्हा आयसीयूमध्ये हलवले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वैभव घबराट होत असल्याने नर्सने त्याला ऑक्सिजनवर ठेवले. वैभवची प्रकृती खालावत असल्याचे पाहून डॉक्टरांना बोलावून वैभवला सीपीआर देण्यात आला.
कुटुंबीय संतप्त
सीपीआर दिल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी तेथून निघून गेले. अचानक ऑक्सिजन मास्कने पेट घेतला. आग लागल्याचे पाहून वैभवला वाचवण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवचा भाऊ गौरवने धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. वैभवच्या भावाने सांगितले की, आग विझवली तेव्हा ऑक्सिजन मास्कपूर्णपणे वैभवच्या चेहऱ्याला चिकटला होता. त्यामुळे वैभवच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही नातेवाईकांनी नकार दिला. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसोबतच नुकसान भरपाईच्या मागणी देखील यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.