इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानातील जयपूर न्यायालयात एक वेगळी घटना घडली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पत्नीला पोटगी देण्यासाठी पतीने थेट ५५ हजार रुपयांची नाणी आणली. ७ गोण्यांमध्ये आणलेली ही चिल्लर पाहून सर्वच थक्क झाले.
७ गोण्यांमध्ये ५५ हजार रुपयांची नाणी घेऊन एक तरुण जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात पोहोचला. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी ही रक्कम द्यावी लागली. इतकी नाणी पाहून पत्नीला राग आला. न्यायालयातही पती माझा मानसिक छळ करीत आहे, असा आरोप पत्नीने केला. मात्र, पतीने न्यायालयापुढे स्पष्ट केले की, हे भारताचे वैध चलन आहे, ते स्वीकारले पाहिजे. अखेर पतीला नाणी मोजून प्रत्येकी एक हजार रुपयांची पिशवी तयार करून पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार आहे.
दशरथ कुमावत असे नाणी आणणाऱ्या पतीचे नाव आहे. त्याचे वकील रमण गुप्ता यांनी सांगितले की, दशरथचा विवाह सीमा कुमावत यांच्याशी १० वर्षांपूर्वी झाला होता. लग्नाच्या ३-४ वर्षानंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाला. पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. कौटुंबिक न्यायालयाने पतीला दरमहा पत्नीला पाच हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. अधिवक्ता रमण गुप्ता यांनी पुढे सांगितले की, दशरथ गेल्या ११ महिन्यांपासून पत्नीला ही रक्कम देत नव्हता. यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध रिकव्हरी वॉरंट जारी केले. त्यानंतरही पैसे न दिल्यास अटक वॉरंट बजावण्यात आले. पोलिसांनी दशरथला अटक करून न्यायालयात हजर केले. अखेर ही रक्कम देण्यासाठी पती दशरथ याने ७ गोण्यांमध्ये ५५ हजार रुपयांची नाणी आणली. हे पैसे त्याने भरल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान, तक्रारदार सीमा कुमावत यांचे वकील रामप्रकाश कुमावत यांनी सांगितले आहे की, नाणी मोजण्यासाठी १० दिवस लागतील.
या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.