इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थान कॅडरच्या २०१६ बॅचच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेमधील टॉपर आयएएस अधिकारी टीना डाबी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे. त्यांचे लग्न २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी होणार आहे. दोघेही जयपूर येथील एका हॉटेलमध्ये २२ एप्रिल रोजी विवाहबद्ध होणार आहेत. टीना डाबी यांचे पहिले लग्न २०१८ रोजी अतहर खान यांच्याशी झाले होते. हे लग्न केवळ दोन वर्षे टिकू शकले.
कोण आहेत डॉ. प्रदीप गावंडे
प्रदीप गावंडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला होता. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिले आहेत. टीना डाबी यांच्यापेक्षा ते तीन वर्षांनी मोठे आहेत. त्यांनी २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. प्रदीप गावंडे हे एक डॉक्टर आहेत. यूपीएससी परीक्षा देण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली होती. प्रदीप यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटनुसार, ते २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत. सध्या ते राज्यस्थानच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागात संचालकपदी तैनात आहेत.
साखरपुड्याची घोषणा
टीना डाबी आणि डॉ. प्रदीप गावंडे यांनी आपापल्या सोशल मीडिया पेजवर साखरपुड्याची घोषणा केली आहे. टीना यांनी डॉ. प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर करून लिहिले, की तुम्ही दिलेले स्मित मी स्वीकारले आहे. त्यांनी #fiance असा हॅशटॅग वापरून पोस्ट संपवली आहे. चाहत्यांनी दोघांचेही सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे.
टीना या सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय आयएएस अधिकारी आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे १.४ लाख फोलोअर्स आहेत. या ठिकाणी त्या आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करत असतात. त्यांच्या बहीण रिया डाबीसुद्धा आयएएस अधिकारी आहेत. टीना डाबी यांचे पहिले लग्न आयएएस टॉपर अतहर आमीर खान यांच्याशी झाले होते. परंतु गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता.