इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानात अतिशय संताजनक घटना घडली आहे. भरतपूर जिल्ह्यात एक दीर तिच्या वहिनीला घेऊन जात होता. त्याचवेळी सहा जणांनी त्यांची वाट अडवली. दीराच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला धाक दाखविण्यात आला आणि त्याच्या समोरच सहा नराधमांनी या महिलेवर बलात्कार केला.
पहाडी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरी गेलेल्या आपल्या वहिनीला घेण्यासाठी दीर गेला होता. वहिनीला घेऊन तो रात्री ९ वाजेच्या सुमारास परतत होता. त्याचवेळी घाटमिकाच्या जंगलात सहा जणांनी त्यांची वाट अडवली. दोघांनाही गाडीवरुन खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर एकाने दीराच्या डोक्याला बंदूक लावली. थोडीही हालचाल केली तर गोळी घालण्याची धमकी दिली. तसेच, अन्य जणांनी वहिनीवर अत्याचार करण्यास प्रारंभ केला. दीराने हात जोडून विनवणी केली पण त्यांनी काहीच ऐकले नाही. त्यानंतर दीराच्या डोळ्यादेखतच या सहाही नराधमांनी त्या महिलेवर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर हे सहाही जण पळून गेले. दीर आणि वहिनी घरी आले आणि त्यांनी घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पतीने पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.