इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माझ्या नवऱ्याची बायको अशी एक मालिका खूप गाजली. यात एका नवऱ्याचे बाहेरचे लफडे बायको कसे टॅकल करते ते दाखविले आहे. पण राजस्थानमध्ये एका नवऱ्याने स्वतःच्याच बायकोची एक नव्हे चार लग्न लावून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
लोयकालिका आणि दिप्ती हे नवरा बायको आहेत. पण लुटमार करून स्वतः ऐशोआराम करण्यासाठी दोघेही साध्याभोळ्या लोकांना फसवत होते. आतापर्यंत दिप्तीचे तीन वेगवेगळ्या नवऱ्यांसोबत लग्न लावून दिल्याची कबुली स्वतः लोयकालिकानेच दिली आहे. चौथे लग्न लागले खरे मात्र त्यानंतर लगेच चोरी करण्याचा त्यांचा प्लान फसला. २१ जूनला दिप्ती आणि हरीमोहन यांचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी दिप्तीच्या वागणुकीत, तिच्या हालचालीमध्ये बदल असल्याचे हरीमोहनला आढळून आले. त्याने आपल्या घरातील लोकांना हे सांगितले. हा आपला संशय असल्याचे सांगत त्याने कुटुंबियांना सतर्क केले. मात्र हरीमोहनच्या भावाचे पूर्ण लक्ष होते.
एक दिवस दिप्ती घरातून पळण्याच्या तयारीत असल्याचे हरीमोहनच्या भावाच्या लक्षात आले. त्याने लगेच तिला रोखले आणि पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दिप्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या खरोखरच्या नवऱ्याला बोलावण्यात आले. त्याने उलट आरोप करत हरीमोहनच्याच कुटुंबियांनी दिप्तीला फसवल्याचे पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने दोघांकडूनही गुन्ह्याची कबुली घेतली.
चारवेळा बायकोचे लग्न
दिप्तीचे चार वेगवेगळ्या मुलांसोबत लग्न लावून दिल्याची कबुली तिच्या खऱ्या नवऱ्याने दिली. दोघेही बंटी-बबली स्टाईलने लोकांची फसवणूक करून लग्न करायचे आणि त्यानंतर त्यांच्या घरातील दागीणे व पैसे घेऊन पसार व्हायचे.