विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे ग्रह जागेवर नाहीत. अश्यात मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आहे तो दमही निघून जातोय. आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी गहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात आणि काँग्रेस कार्यकारीणीत स्थान दिले नाही, तर आमचा मार्ग मोकळा आहे, असा थेट इशाराच पायलट यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमानची अस्वस्थता वाढलेली आहे.
काँग्रेसमधील अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तसेही वातावरण तापलेले आहे. त्यात पायलट यांनी सत्तेत व संघटनेत आपल्या भागिदारीसाठी चांगलाच जोर लावला आहे. गहलोत यांना आणखी वेळ देण्याच्या मूडमध्ये आपण नाही, असे त्यांनी हायकमानला कळविले आहे.
आमच्या समर्थकांना गहलोत हे जाणूनबुजून सहभागी करून घेत नाहीत, असा आरोपच त्यांनी केला आहे. राजस्थानसह पंजाब, केरळ, गुजरातमध्येही विविध आव्हानांचा सामना करणाऱ्या काँग्रेस हायकमानसाठी पायलट आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करणे सद्यस्थितीत सर्वांत महत्त्वाचे काम आहे. विशेषतः पक्षाचा प्रमुख युवा चेहरा असलेले जितिन प्रसाद यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली आहे.
हायकमानची मध्यस्थी
एकीककडे सचिन पायलट यांना संयम बाळगण्याचा व संवाद कायम ठेवण्याचा सल्ला काँग्रेस हायकमान देत आहे, तर दुसरीकडे गहलोत यांना राजकीय वास्तव स्वीकारून पायलट आणि समर्थकांना सत्तेत सामावून घेण्याचाही सल्ला देत आहे. हायकमानच्या मध्यस्थीचा किती उपयोग होतो हे वेळच सांगेल.
प्रियंका संपर्कात
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी स्वतः सचिन पायलट यांच्या संपर्कात आहे. या प्रकरणात त्या थेट सचिन यांच्याशी संवाद साधून संयम बाळगण्याचे आवाहन करीत आहेत.