जयपूर/नवी दिल्ली – असे म्हटले जाते की, भाकरी का करपली? तर ती फिरवली नाही म्हणून. त्यामुळे कोणतीही गोष्ट कायम नसते, त्यात बदल करावा लागतो. मग ती गोष्ट वैयक्तिक जीवनात असो की सार्वजनिक ठिकाणी. राजकारणात तर बदल हा अपरिहार्य मानला जातो. केंद्राचा असो की एखाद्या राज्यात मंत्रिमंडळात नेहमीच बदल होत असतात. प्रत्येकाला खूश ठेवणे शक्य नसते, तरीही अधिकाधिक नेत्यांना प्राधान्य देऊन राजकारण करण्याचे कौशल्य पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना साध्य करावे लागते.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करून अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात काँग्रेसला यश आले आहे. या बदलात ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्या समर्थकांना स्थान देण्यात आले असून, पक्षाने सन २०२३ साठी निवडणुकीचे मैदान तयार केले आहे. मागासवर्ग तथा दलित आणि महिलांना विशेष प्राधान्य दिले आहे. सुमारे वर्षभर चाललेल्या कसरतीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नाराजी कमी करण्यात काँग्रेसला यश आले आहे. यामुळेच या बदलाने पायलट खूश दिसत होते. कारण त्यांच्या पाच समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
राजस्थानमध्ये दलितांची संख्या १८ टक्के आहे. त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागात राहत असून हे मतदार सामान्यतः भाजपला मतदान करत आहेत. मात्र २०१८ च्या निवडणुकीत मोठ्या संख्येने दलितांनी काँग्रेसला मतदान केले होते. त्यामुळे दलितांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पंजाबच्या धर्तीवर दलित मंत्र्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या फेरबदलानंतर गेहलोत मंत्रिमंडळातील दलित मंत्र्यांची संख्या नऊ झाली आहे. त्यात सात कॅबिनेट मंत्री आणि दोन अनुसूचित जाती आणि जमाती राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर महिलांबाबत प्रादेशिक समतोल साधण्याचाही पक्षाने प्रयत्न केला आहे. या फेरबदलात काँग्रेसनेही अनेक समीकरणे जुळवली आहेत. आता मंत्रिमंडळ फेरबदलानंतर बोर्ड आणि कमिशनच्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नियुक्त्याही लवकरच अपेक्षित आहेत. यातही पायलट समर्थकांनाही स्थान मिळू शकते. त्याचबरोबर सुमारे डझनभर आमदारांना संसदीय सचिव आणि सुमारे सहा जणांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. त्यामुळे २०२३ च्या निवडणुकीत पक्ष पुन्हा एकदा विजय मिळवून सत्ता राखू शकेल.
पक्षाचे काही रणनीतीकार या फेरबदलाला सुरुवात मानत आहेत. कारण एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, मंत्रिमंडळ फेरबदल ही २०२३ मध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात आहे. नव्या रणनीतीनुसार पक्षाची वाटचाल सुरू आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यात आणखी काही बदल होऊ शकतात. कारण, पुढची विधानसभा निवडणूक पायलट यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.