इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा आपल्याकडे प्रचलित आहे. पती हा परमेश्वर असून त्याच्यासोबत जुळलेली रेशीमगाठ एक नव्हे सात जन्म निभवायची असते, असे म्हटल्या जाते. रुसवे-फुगवे, कुरबुरी असल्या तरी सुखाने संसार करत, एकमेकांना साथ देण्याची कुटुंबपद्धती आपल्याकडे सुरुवातीपासून आहे. मात्र, आपल्या या मान्यताना छेद देणारे प्रकार समाजात घडत असतात. राजस्थानात अशीच एक घटना घडली आहे. अपघातात ड्रायव्हर पतीने पाय गमावले म्हणून संसार करण्यास पत्नीने नकार दिल्याचा प्रकार पुढे आला आहे.
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं… अशी चित्रपटातील गाणी प्रत्यक्षात लागू होतीलंच याचा भरवसा नसतो. चित्रपटातील हिरो-हिरोइनप्रमाणे अनेक जण प्रेमाच्या, सुखी संसाराच्या आणाभाका घेतात. पण, प्रत्यक्षात नाते जपण्याची, ते टिकवण्याची वेळ येते तेव्हा अनेक जण साथ सोडून जातात. आयुष्यभर ज्या पतीने आपल्या कुटुंबासाठी राबराब मेहनत घेतली. ज्या पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी विकत घेतली, त्याच पत्नीने पती पायाने अधू झाला म्हणून त्याच्यासोबत संसारास नकार दिला आहे.
भरतपूर जिल्ह्यातील डीगजवळील पाडला गावात राहणारा उन्नस काही वर्षांपूर्वी ट्रकचालक होता. तो देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जात असे. तो जे काही कमावायचा ते सर्व पत्नीला द्यायचा. जमीन विकत घेताना त्याने पत्नीच्या नावावर ती खरेदी केली होती. पण, ४ वर्षांपूर्वी एक अपघात झाला, ज्यात उन्नसचे दोन्ही पाय कापले गेले. उपचार काही वर्षे चालले. अशा परिस्थितीत पत्नीनेही उन्नसला सोबत ठेवण्यास नकार दिला. उन्नस आता सर्वत्र न्याय मागत आहे.
२५ वर्षांपूर्वी झाले लग्न
उन्नस याचे २५ वर्षांपूर्वी कोटाकला या गावी जाहिदाशी लग्न झाले. तिला आधीच एक मुलगी होती. तरीदेखील उन्नसने तिचा स्वीकार करत सुखाचा संसार करण्याचा संकल्प सोडला. मात्र, आता एका अपघाताने त्याच्यावर सर्व काही गमावण्याची वेळ आली आहे.
Rajasthan Alwar Husband Wife Couple Refused