इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आता ठाकरे बंधु विजयी मेळावा घेणार असून त्याचे ठिकाणही आता ठरले आहे. हा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात साजरा होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित रोहणार आहे. या मेळाव्याची जोरदार आणि जय्यत तयारी सुरु झाली आहे.
काल राज ठाकरे यांनी म्हटले होते की, येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल. आणि अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितली ती म्हणजे सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की. बाकी ५ तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील.
आता हा तपशील सामना दैनिकातून सांगण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना व मनसेच्या नियोजनाच्या बैठका सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.