मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. राज्यात एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. आज त्याचा सहावा दिवस आहे. यासंदर्भात कुठलाही तोडगा निघताना दिसत नाही. याचसंदर्भात राज यांनी पवार यांची भेट घेतली.
एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य सरकारी सेवेत करावे, अशी मुख्य मागणी त्यांची आहे. यावेळी कर्मचारी प्रतिनिधींनी त्यांची आपबीती राज यांच्यासमोर कथन केली. त्याची दखल राज यांनी घेतली. राज्यात आजवर ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण आत्महत्या थांबवा. तेव्हाच मी आपले नेतृत्व करेल. माझा आपल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे, असे राज यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर आता राज यांनी याच प्रश्नी पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. तसेच, यावर काय तोडगा काढता येईल, याचाही विचार झाला आहे.