इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने विजयासाठी १२८ धावांचे आव्हान दिले होते. ते टीम इंडियाने ३ विकेटस गमावत १५.५ ओव्हरमध्येच पूर्ण करुन १३१ धावा केल्या. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुर्यकुमार यादव यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. या सामन्यात भारतीय संघाने पाकीस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोन न करता त्यांना धडा शिकवला. पण, या सामन्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिकात्मक व्यंगचित्र काढून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व त्यांचे पुत्र जय शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात आयसीसीआय व गृहमंत्रालयावर टीका केली आहे. यामध्ये अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले असे म्हणत नक्की कोण जिंकल? आणि नक्की कोण हरलं? असा सवाल उपस्थित केला आहे. हे व्यंगचित्र प्रहार करणारे व बोलके आहे.
याअगोदर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी पाकिस्तान जिंकला – पराभूत झाला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो. पैशांसाठी खेळले, एका सामन्यावर बहिष्कार टाकू शकले नाही अशी टीका केली होती. भारत विरुध्द पाकिस्तानच्या सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे १००० कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. तसचे दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण २५ हजार कोटी रुपये पाकिस्तान गेले. आता हाच पैसा आपल्याविरुध्द वापरला जाणार असेही त्यांनी सांगितले होते.
