मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘ठाकरे ‘ या नावा भोवतीच वलय आहे असे म्हटले जाते, कारण ठाकरे घराण्याची सध्या चौथी पिढी समाजकारण तथा राजकारणात आहे, असे दिसून येते. मनसेनेते राज ठाकरे यांना तर राजकारणात मोठे ग्लॅमर आहे, आता त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते भावी आमदार होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतला नसला तरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते, तसेच सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून सुरुवातीच्या काळात या संघटनेचे स्वरूप सामाजिक असे ठेवले तरी नंतर राजकारणात भाग घेऊन अनेक निवडणुकीच्या सभा गाजवल्या. परंतु प्रत्यक्ष त्यांनी निवडणूक लढविली नाही. तर त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे केले आणि आमदार, खासदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते इतकेच नव्हे तर लोकसभेचे सभापती देखील त्यांच्या पक्षाचे नेते बनले होते.
बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवणार नाही, असा असे जाहीर केलेले होते. त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला तरी निवडणूक लढविली नाही, परंतु उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवून ते आमदार झाले. कालौघात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री बनले तर आदित्य ठाकरे हे मंत्री बनले.
राज ठाकरे यांनी सुद्धा प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती परंतु नंतर त्यांनी यू टर्न घेत निवडणूक आपण निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र आता त्यांचे चिरंजीव आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मात्र वेळ पडल्यास आपण निवडणूक लढू असे म्हटले आहे, अर्थातच ते काही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार नाहीत, हे निश्चित. त्यामुळे ते पुढे विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक लढवतील, असे म्हटले जाते म्हणजेच ते भावी आमदार किंवा खासदार आहेत, असे देखील चर्चा सुरू आहे.
अर्थात या संदर्भात आत्ताच काही निश्चित सांगता येत नसले तरी भविष्यात काय होऊ शकते ते काळच ठरवेल असे दिसून येते. दरम्यान, अमित ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या वक्तव्यांनी राजकीय तज्ज्ञांचे लक्ष वेधल्या घेतले गेले आहे. यावेळी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही महाराष्ट्रभर फिरून नव्याने संघटन बांधण्यासाठी प्रयत्न करत आहात, भविष्यात निवडणूक लढवण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असे विचारल्यावर अमित म्हणाले की, पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही लढवायला तयार आहे.
वडील राजकारणात आहेत म्हणून मी राजकारणात आलो, अन्यथा मी राजकारणात उतरलो नसतो, असे अमित यांनी म्हटले असून आताची राजकीय परिस्थिती बघून राजकारणात येण्याची इच्छाच झाली नसती. कारण सध्याची राजकारणातली परिस्थिती भयावह असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून खरी शिवसेना कुणाची, यावरुन राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद पेटला आहे. यावरही अमित ठाकरेंनी भाष्य केले. यासंदर्भात मला बाळासाहेबांसाठी वाईट वाटले. बाकी कुणासाठी काही वाटले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो.
अमित ठाकरे हे दोन वर्षांपूर्वी वयाच्या २८ व्या वर्षी राजकारणात आले त्यांच्याकडे मनसेच्या युवा संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून ते महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत, यावेळी ते म्हणाले की, मनसेने सुरु केलेले भोंगे आंदोलनात आम्हाला सरकारला जागे करायचे होते ते आम्ही केले. आता हा प्रश्न सरकारला विचारा. मात्र महाराष्ट्राला आता राजसाहेबांची गरज आहे हे मला माहित आहे. आम्ही आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. युती करायची की नाही, हा निर्णय राजसाहेब घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Raj Thackeray Son Amit Political Career Indication