मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीतून मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, काल कुर्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्या सभेतील एक क्लिप मी पाहिली. व्यासपीठावर शिंदेचा फोटो, त्यांच्या उमेदवारांचे नाव आणि मंचावर एक तरुणी भोजपुरी गाण्यावर नाचतेय, हीच का तुमची लाडकी बहीण योजना असे सांगत निशाणा साधला. राजकीय व्यासपीठांवर बायका नाचवण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहारमध्ये घडतात. महाराष्ट्राचा यूपी, बिहार करायचा का असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर उल्हास भोईर, भगवान भालेराव आणि संगीताताई चेंदवणकर उपस्थित आहेत. यावेळी ते म्हणाले की, संगीताताईनी बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यामुळे ती भयानक घटना महाराष्ट्राच्या समोर आली, आख्ख प्रशासन हललं. त्यांनी जे काम केलं त्याची शाबासकी म्हणून त्यांना मी विधानसभेची उमेदवारी दिली.
आज मी तुमच्याकडून हमी घ्यायला आलोय की जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही विजयी कराल. हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्राची आज जी अवस्था आहे ती बदलण्यासाठी. २०१९ ला युतीत कोण होतं, आघडीत कोण होतं आता युतीत कोण आहे आघाडीत कोण आहे काहीच कळत नाहीये. गेल्या ५ वर्षात जे घडलं त्याची मतदारांनी उजळणी केली पाहिजे. कोणी कुठेही गेलं, पण आमचा राजू विधानसभेत एकटा होता, आणि मला राजुचा अभिमान आहे की माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता.
२०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्यासमोर कोण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. मग निकाल लागले, मग सकाळी एक शपथविधी झाला, ते लग्न १५ मिनिटांत तुटलं, कारण काकांनी डोळे वटारले मग हे आले घरी काका मला माफ करा म्हणत. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोरबर उद्धव ठाकरे जाऊन बसले. कारण काय तर अमित शाह यांनी मला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. तुमच्यासमोर जर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मग तेंव्हाच का नाही आक्षेप घेतलात ? २०१९ चा निकाल लागेपर्यंत गप्प बसले आणि जेंव्हा लक्षात आलं की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही तेंव्हा यांनी अडीच वर्षांचा मुद्दा बाहेर काढला.
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्यावर त्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख हिंदुहृदय सम्राट करणं बंद केलं. होर्डिंगवर पण हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख करणं बंद केलं. काही ठिकाणी होर्डिंगवर तर उर्दूत त्यांनी चक्क जनाब बाळासाहेब ठाकरे पण लिहिलं. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतके खाली गेलात तुम्ही ? मग हे गेले काँग्रेसबरोबर, यांची अडीच वर्ष संपली आणि यांना यांचे चाळीस कुठे गेले हे कळलंच नाही. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही. त्यांच्याकडे गुप्तचर विभाग रोज काय चाललं आहे हे सांगत असतात तरी मुख्यमंत्र्यांना कळलं नाही. या चाळीस जणांना घेऊन जाणारे एकनाथ शिंदे काय म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आणि त्यातल्या त्यात अजित पवारांबरोबर बसताना आमचा श्वास कोंडतो. मग पुढे अचानक अजित पवार मांडीत येऊन बसले. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून बाहेर पडले आणि इथे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. काय राजकारण सुरु आहे ? महाराष्ट्रात इतके ज्वलंत प्रश्न सुरु असताना हे सगळे हवं तसं वागतात कारण तुम्ही चिडत नाही, शांत लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असतात. महाराष्ट्रातील जनता आम्ही कसेही वागलो तरी आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची खात्री आहे त्यांना.
पूर्वी गद्दारी करणारे मान खाली घालून जायचे आता काही वाटत नाही या लोकांना. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला आणि तरीही तुम्हाला काही वाटत नसेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. फोडाफोडीचं राजकारण आधीपासून सुरु आहे, पण प्रकरण आता पुढे गेले, पण आता पक्ष, नाव, निशाणी ताब्यात घ्यायची. असं तर मी कधी बघितलं नव्हतं. एकनाथ शिंदे, अजित पवारांनी नाव, चिन्ह, घेतलं. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी ना ही उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे, ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसले हात घालता तुम्ही ? माझे कितीही मतभेद असू देत पण राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, ती अजित पवारांची नाहीये. महाराष्ट्राची किती वैचारिक घसरण झाली आहे ? देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची ही दशा ?
महाराष्ट्रातले प्रश्न प्रलंबित असताना आपल्याकडे चेष्टा सुरु आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रासाठी जागा रहा. आपल्याकडे त्या ओळी आहेत ना महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले।अनेकांचा डोळा आहे हे राज्य मारण्यासाठी. महाराष्ट्रात ज्या चुकीच्या गोष्टी सुरु आहेत त्या तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत. मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून माझ्या हाती सत्ता द्या असे त्यांनी सांगितले.