पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू राज ठाकरे हे उत्तम असे व्यंगचित्रकार आहेत, हे सारेच जाणतात. बाळासाहेबांची व्यंगचित्रे तर आजही वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये संग्रही आहेत. राज यांना काकांकडूनच गुण आलेत, असेही बोलले जाते. राज यांनी एकदा टॅक्सीचं चित्र काढण्यासाठी आपण केलेली युक्ति सांगितली आणि साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं.
मुंबईत अर्ध्याहून अधिक टॅक्सीचालक हे उत्तरप्रदेश किंवा बिहारचे आहेत. राज यांची युपी-बिहारच्या बाबतीत काय भूमिका आहे, हे आता देशभर कळून चुकले आहे. अश्यात राज यांनी एका टॅक्सीचालकाला घरी बोलावणे किती भितीदायक असेल, याचा तुम्ही विचार करू शकता. राज यांनी अलीकडेच जागतिक मराठी संमेलनात झालेल्या प्रकट मुलाखतीत यासंदर्भातील किस्सा सांगितला. त्यांनी एकदा एका टॅक्सीचालकाला बोलावले आणि त्याला ड्रायव्हिंग सीटवरून बाहेर यायला सांगितले. त्यानंतर त्यांनी टॅक्सीचा फोटो काढला आणि मग त्यावरून व्यंगचित्र काढलं.
मैने क्या किया साहाब?
राज यांनी टॅक्सीचालकाला बाहेर यायला सांगितले तेव्हा तो घाबरून गेला. तो मुकाट्याने बाहेर तर आला, पण घाबरूनच ‘मैने क्या किया साहाब?’, असा प्रश्न विचारला. त्यावर राज यांनी तू काहीच केलं नाहीस, तू बाजुला हो… मला टॅक्सीचा फोटो काढायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर राज यांनी त्या टॅक्सीचा फोटो काढला.
कचऱ्याचा फोटो
राज म्हणाले की, एकदा बाळासाहेबांनी त्यांना कचऱ्याचं व्यंगचित्र काढायला लावलं होतं. एखादं व्यंगचित्र काढायचं म्हटल्यावर डिटेलिंग्स खूप लागतात. आपण कचऱ्याचं चित्र काढताना त्यातील सगळे घटक टिपले होते, असं राज म्हणाले.
घंटा वाजते
राजकारण्यांची व्यंगचित्र काढण्यासाठी संबंधित पुढाऱ्याकडे बघितल्यावर घंटी वाजायला हवी. पण हल्लीचं राजकारण बघितलं की घंटी नाही घंटा वाजते, अशी मिश्किलीही राज यांनी केली.
Raj Thackeray on North Indian Taxi Driver Incidence