मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राने बघितले आहे. दोघेही एकमेकांवर जाहीर सभांमधून टिका करताना सगळे बघतात. पण त्यांचे कौटुंबक धागे तुटलेले नाहीत. याची प्रचिती देणारी राज यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची माझा कट्ट्यावरील मुलाखत चांगलीच गाजली आहे. ही मुलाखत मुळीच राजकीय नसल्याने प्रत्येकाच्या पसंतीला पडली. अशीच एक मुलाखत आत्ता माझा कट्ट्यावर झाली. या मुलाखतीला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे होत्या. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण एका प्रश्नावर त्यांनी स्पष्टच मत व्यक्त केलं. हा प्रश्न स्वाभाविकच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होता.
ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होती. त्यामुळे साऱ्यांसाठीच हा भावनिक प्रसंग होता. पण उद्धव यांनी राजीनामा दिला त्यावेळी काय भावना होती, असा प्रश्न राज यांच्या मातोश्रींना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘अतिशय वाईट वाटलं’ अशी भावना व्यक्त केली. शीवतीर्थावर ठाकरे कुटुंबातील पहिल्याच व्यक्तीने गोपनियतेची शपथ घेतली. अख्खे ठाकरे कुटुंब शीवतीर्थावर उपस्थित होते.
शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुंदाताई ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना अश्रू अनावर झाले आणि उद्धवही भावूक झाले. त्यामुळे राजीनाम्याच्या वेळी काय भावना होती, हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘माझं लग्न झालं तेव्हा उद्धव चार वर्षांचा होता. माझ्या बहिणीचा मुलगा आहे असे कधी वाटलेच नाही. एवढा जिव्हाळा होता. त्यामुळे ज्यादिवशी त्याचे मुख्यमंत्रीपद गेले त्यादिवशी अतिशय वाईट वाटले.
काकू आणि मावशी!
कुंदाताई ठाकरे या उद्धव यांच्या मातोश्री माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी. त्यामुळे कुंदाताई ठाकरे आणि उद्धव यांच्यात काकू-पुतण्या व मावशी-भाचा असे नाते आहे. यापूर्वीही दोन्ही कुटुंबातील भावनिक बंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. राजकीय पटलावरील खेळ आणि कौटुंबिक पातळीवरील मेळ दोन्ही बाजुने वेगळा ठेवण्यात आला आहे, हे विशेष.
Raj Thackeray Mother Kunda on Uddhav CM Post Resign