मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वत्र दिवाळीच्या सणाची लगबग सुरू असताना आता राजकीय भेटीगाठींना देखील उधाण आले आहे, असे म्हटले जाते. त्यातच सध्या मुंबईत अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय क्षेत्रात या संदर्भात चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेसच्या नेत्या व माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेत्यांनी मुख्य मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काय चर्चा केली याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. मात्र या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप कोणाला कळलेला नाही, असे दिसून येते.
सध्या राज्यात राजकीय गोंधळ घडत असताना, आता नवे राजकीय समीकरण जुळून येण्याचे चिन्हे दिसत आहे. मागील काही दिवसात भाजपचे वरिष्ठ नेते हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सातत्याने भेट घेत आहे, या भेटींमुळे भाजप- मनसे युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यात आता शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने आता काय होणार? असे म्हटले जाते. वर्षा गायकवाड यांच्या भेटीचं नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण शालेय शिक्षण विभागातील काही प्रश्नांच्या संदर्भात ही भेट घेत त्याचे सांगितले जात आहे. तसेच राज ठाकरेंनी आरोग्य विषयक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. कारण राज ठाकरे यांच्या भेटीवेळी शिंदेंसोबत बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
वर्षा गायकवाड यांनी राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केले. घरातून राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी स्वयंसेवी संस्थेमार्फत समाजकारणाला सुरुवात केली. गायकवाड राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी दोन वेळा धारावी मतदारसंघातून निवडून येऊन त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्रालय सांभाळले. त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले. याचबरोबर त्यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणूनही काम केले.
राज ठाकरे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. दोन महिन्यात तीन वेळा शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याने सर्वांना उत्सुकता लागून आहे, आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचे प्रमुख कारण असले तरी यात राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता आहे, त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी सध्या रणशिंगण फुकले आहे.
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे राजकीय समीकरण बदलून गेले आहे. सध्या मनसेने हिंदुत्वावर पकड मजबूत केल्यामुळे शिवसेनेला मोठ्या धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप आणि शिंदे गटाने मनसे सोबत युती केल्यास आता थेट फटका शिवसेनेला बसू शकतो. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीबाबतही राज ठाकरे व शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्याप्रमाणेच ठाकरेंनी ही बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाने राज्यात काम केलेले आहे, पण सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे गटात सध्या रस्सीखेच सुरू आहे. मनसे राज्य सरकारमध्ये सहभागी होणार असेही बोलले जात होते. परंतु अद्याप यावर कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गट सातत्याने जवळ येताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी मनसे-शिंदे गट युतीचे संकेत दिले होते.
Raj Thackeray Eknath Shinde Varsha Gaikwad Meet Politics