नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबध नाही असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इगतपुरीमध्ये अनौपचारिक गप्पादरम्यान सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी राज ठाकरे हे आले आहे. त्यावेळेस पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधु विजयी मेळाव्या निमित्त एकत्र आले. ५ जुलै रोजी मुंबईत वरळी डोम सभागृहात हा मेळावा साजरा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळेस उध्दव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो तो एकत्र राहण्यासाठी असे वक्तव्य करुन युतीचे संकेत दिले.
पण, नाशिक येथे राज ठाकरे यांनी सावध पवित्रा घेऊन विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबध नाही असे सांगितले.