त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दीड आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिणे येथे रविवारट्या सुटीनिमित्त तुफान गर्दी पहायला मिळाली. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. परिणामी, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. यंदा पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने पर्यटकांना शिस्तीचे पालन करावे लागले.
राज्यात विविध पर्यटन ठिकाणांवर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर वनविभागातर्फे विविध पर्यटनस्थळां प्रमाणेच त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिणे घाट, नेकलेस धबधबा, दुगारवाडी धबधबा, हरिहर किल्ला, तोरंगण घाट अशा विविध ठिकाणच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई केली आहे. त्या पार्श्वभुमीवर पहिणे घाटात जाणार्या पर्यटकांना रोखण्यासाठी आज सकाळी सात वाजेपासूनच ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदिप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी टिळे व त्यांच्या सहकार्यांनी सकाळी सात पासूनच पेगलवाडी फाट्यावर बंदोबस्त लावला होता. त्यामुळे अनेक पर्यटकांना माघारी जावे लागले. वाहनांना प्रवेशबंदी केल्याने काही पर्यटकांनी वाहने फाट्यावरच सोडून घाटाकडे पायी जाण्यास निघाले. काही काळानंतर याठिकाणी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने त्याचा परिणाम नाशिक-त्र्यंबक रोडवर वाहतूक कोंडी झाली.
काही वाहने पेगलवाडीकडे तर काही वाहने त्र्यंबककडे काढून देण्यात आली. तर घाटाच्या सुरुवातीला वाडीवर्हे पोलीसांनी पर्यटकांना अडवले. येथे पो.ह. भगवान भगत, अमोल आंभोरे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त लावला होता. काही पर्यटकांनी नदी, ओहळातील पाण्यामध्ये बसून आनंद घेतला. गेल्या रविवारी पन्नास हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती त्यामानाने आज पर्यटकांची संख्या नगण्यच म्हणावी लागेल. मात्र याचा फटका तेथील मक्याचे कणसे, चहा विक्रेत्यांना बसला. तर वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलिसांना दिवसभर रस्त्यावरच उभे राहणे क्रमप्राप्त झाले होते.
Rainy Season Trimbakeshwar tourist police traffic