मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, पण त्याचा फायदा उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्याला जास्त झाला. यावर्षी कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा शिल्लक आहे, याची आकडेवारी पुढे आली तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ज्या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम समजले जाते त्याच पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ज्या नागपूरला दरवर्षी हजारो टँकरच्या भरवशावर जगावे लागते, त्याच नागपूरला राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मॉन्सून स्थिरावला आहे. पंधरा दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यात थोड्याफार अंतराने पाऊस सुरूच आहे. पण तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची पातळी वाढवेल, असा पाऊस अद्याप पडलेला नाही.
ऑगस्ट अखेरपर्यंत परिस्थिती बदलली नाही तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यांत सर्वांत कमी १७.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, असे सरकारची आकडेवारी म्हणते. ज्या कोयना धरणावर सर्वाधिक भिस्त असते तेथील पाणीसाठी १५.६५ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. जलपंसदा विभागाने अलीकडेच एक आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार राज्यातील सगळ्या धरणांमध्ये मिळून २९.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी यापेक्षा दहा टक्क्यांनी अधिक पाणीसाठा शिल्लक होता, हे महत्त्वाचे.
कुठे किती पाणी?
अमरावती जिल्ह्यात ३७.८२, संभाजीनगरमध्ये २४.५७, कोकणात ४८.३७, नाशकात १८.६६ तर नागपूरमधील धरणांमध्ये ४४.६९ टक्के पाणीसाठा असल्याचे आकडेवारी म्हणते. त्यामुळे नागपूर जिल्ह्याला यावर्षी चिंता करण्याचे कारण नाही हे स्पष्ट होते.
जलयुक्त शिवाराचा फायदा
मराठवाडा आणि विदर्भात जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर एक वर्ष पावसाचा काहीच फायदा झाला नाही. मात्र त्यानंतर या दोन्ही प्रदेशांना नेहमीसारखी पाणीटंचाई सहन करावी लागली नाही. विशेष म्हणजे शेतीला सर्वाधिक फायदा झाला.