नवी दिल्ली – देशातील सर्वांसाठीच दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सून सप्टेंबर महिन्यात कृपादृष्टी दाखविणार आहे. या काळात भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा दहा टक्के, तर ऑगस्टमध्ये २४ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या नजरा पावसाकडे खिळल्या आहेत.
नवी दिल्ली येथे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की हवामानाच्या महत्त्वाच्या निकषानुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये मध्य भारताच्या अनेक भागात सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मॉन्सून नऊ टक्के कमी बरसणे बाकी आहे. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्यास ही कमतरता भरून निघेल जूनमध्ये सात टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. ९६ ते १०४ टक्क्यांदरम्यान झालेल्या पावसाची सरासरी किंवा सामान्य पाऊस अशी व्याख्या आयएमडीकडून केली जाते. जूनपासून सप्टेंबरपर्यंत त्याचे मोजमाप केले जाते.
तीन जूनला केरळच्या दक्षिण किनार्यावर मान्सून आल्यानंतर तो १५ दिवसांपूर्वीच आणि जूनच्या अखेरपर्यंत भारताच्या दोन तृतीयांश भागात व्यापला होता. नंतर जूनच्या तिसर्या आठवड्यात तो कमजोर झाला होता. अनेक दिवस सक्रिय राहिला तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडला. महापात्रा म्हणाले की, जुलै आणि ऑगस्टमध्ये मॉन्सून अनिश्चित झाला होता. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर भारतातील एकूण पाऊस ९ टक्के कमी होता. भारतात या वर्षी सरासरी पाऊस पडेल असे हवामान विभागाने जूनमध्ये सांगितले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान कृषी उत्पादन वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती.