नाशिक – जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप नाशकात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरण परिसरात पाण्याच्या पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही. शिवाय दिवसेंदिवस पाणी पातळी घटत आहे. गंगापूर धरण समुहातील सध्याचा साठा लक्षात घेता तो केवळ ४० दिवस पुरेल एवढाच आहे. तसेच, पाऊस नक्की कधी बरसेल याचाही अंदाज येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिका मोठ्या निर्णयाच्या विचारात आहे. या आठवड्यात गंगापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस किंवा धरण साठ्यात वाढ झाली नाही तर आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून दर बुधवारी पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेने दिले आहेत.