‘एल-निनो व शिल्लक धरण पेयजलसाठा वापर‘
गेल्या ३ वर्षांपासून चांगल्या पावसाळ्यांच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई कदाचित जनतेसहित शासन व सिंचन विभागाच्या विस्मरणात जाऊ शकते. परंतु एव्हाना भारतीय हवामान खात्याकडून एल- निनोसंबंधी पुसटसे का होईना गोपनीय संकेत कदाचित मिळाले असतील. त्यामुळे आता वेळीच उपाययोजना केल्यास भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना करण्यास चांगलीच मदत होऊ शकते, असे वाटते. म्हणजे तरी बरे आगाऊ व्यवस्था केली म्हणून बरे झाले,असे म्हणण्यास वाव मिळेल.
दर ४-५ वर्षांनी डोकावणारा ‘एल – निनो ‘ ह्यावर पिण्याच्या पाण्याचे दिर्घ स्वरूपाचे कायमचे उपाय नियोजन सरकारकडून गांभीर्याने विचार होणे गरजेचे वाटते. ‘एल निनो’ शक्यतेच्या पार्श्वभूमीच्या कालावधीत २५‰ पेक्षा किती तरी अधिक जर बाष्पीभवनात आणि ३० ‰ पेक्षा किती तरी अधिक पाणी वहनात, गळतीत काही % वाया जाणार असण्याची शक्यता असेल तर मग शेतीला देऊन एप्रिल मे महिन्यात नियोजन करण्यात धरणात असे किती पाणीसाठा शिल्लक राहू शकतो. म्हणून बाष्पीभवन वेग कमी करून, कालवा पाणी वहनातील त्रुटी दूर करून सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढ करून सदर टंचाई वर्षात कालावधीत पाणीसाठा वाढवता येईल. असे वाटते.नाही तर थेंबाथेंबाने साठवायचे पूर आला कि फुटून वाहु द्यायचे म्हणजे वाया घालवायचे असे म्हणीप्रमाणे होईल. ‘एल-निनो’ पाणी टंचाई अवधीत माणसे, पशु- पक्षी, प्राणी,जनावरांना पिण्यासाठी काय नियोजन करता येईल? ह्यावर सिंचन विभागाकडून विचार होणे गरजेचे वाटते.
जाता जाता अश्या कालावधीत मनी विचार येतो की, नदीजोड प्रकल्प किंवा कोकणातील पाणी पूर्वेकडे वळवण्याचे दोन मोठे पर्याय हाताशी असतांना शासन वेगाने, प्राधान्याने ह्या विषयावर आक्रमण का करत नाही, असा प्रश्न पडतो. का म्हणी प्रमाणे तहान लागल्यावर विहीर खोदायची? केवळ फक्त आपत्ती निधी वाढवून काय उपयोग? त्याबरोबर अश्या पद्धतीच्या नियोजनाच्या उपाययोजना व्हाव्यात असे वाटते.
अजुन तर दुष्काळ, पाणी टंचाई हा विचार जनता, शासन ह्यांना मनी शिवलेलाही मनी दिसत नाही, तरीही धरण साठ्याची उपलब्ध टक्केवारी बाहेर येऊ लागली. आता कोठे दुष्काळाशी सामना करावा लागू शकतो, हा विचार मनी शिवू लागलाय असे वाटते. पाण्याची ओरड सुरु झाली आहे. खरं तर, संभाव्य एल – निनोच्या बातमीने तरी ह्या अगोदरच विचार व्हायला हवा होता. ठिक आहे अजुन वेळ गेलेली नाही.
काय घडते एल-निनो वर्षात?
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर साधारण कोलंबिया, इक्वेडोर देशांच्या पश्चिम किनारपट्टीवर, इतर अनेक कारणाबरोबरच, वि्षूववृत्त दरम्यानच्या, मध्य प्रशांत महासागराचे पृष्ठभागीय समुद्री पाण्याचे तापमान वाढून, हवेच्या दाबाची पोकळी तयार होते. समुद्री पाण्याचा पृष्ठभाग उंचावतो. वि्षूववृत्त समांतर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून पूर्व आशियाई देशाकडील मध्य प्रशांत महासागराकडे उष्ण पाण्याचे प्रवाह वाहु लागतात. त्यामुळे नैरूक्त मान्सूनला भारतीय समुद्रावर चक्रीय वाऱ्याच्या स्थिती निर्मिती होणेसाठी अपेक्षित तयार होणारे कमी, किंवा अतिकमी, तीव्रकमी दाब क्षेत्रे तसेच प्रचंड आर्द्रतेचा भारतीय भू- भागावर आवश्यक रेटा ह्यांचा अभाव हे एल – निनोत घडून येते, असे ढोबळ मानाने सांगता येईल. एका मागून एक पावसासाठी तयार होणाऱ्या अनुकूल प्रणाली ह्या बं. उपसागर व अरबी समुद्रात तयार होत नाही. केवळ आसामकडील राज्ये व तळ कोकणात पाऊस पडतो व संपूर्ण देशभर वातावरण कोरडे असते व दुष्काळ स्थिती तयार होते.
मग सध्या ह्या अवस्थेचे काय लक्षणे दिसत आहेत.
सध्या ला-निना व आयओडी दोन्हीही तटस्थेकडे जाऊ लागलेत. येत्या पावसाळी हंगामात(एन्सो- एल निनो साऊथ ओसिलेशन्स) एल-निनो कडे तर आयओडी धन अवस्थेकडे झुकू लागण्याचे संकेत जाणवू लागलेत. एक पावसासाठी धोकादायक तर एक पावसासाठी पूरक दिसतोय. येत्या तीन आठवड्यात त्याचे चित्र अधिक स्पष्ट होईलच..
ह्या वर्षीच्या एल निनोचे वैशिष्ठ असेही दिसते कि, एल- निनो त पावसाळी हंगामाच्या उत्तर्धात कार्यरत असण्याच्या शक्यतेचे संकेत जाणवू लागलेत. म्हणजेच महाराष्ट्रात ४ महिन्याच्या हंगामात नेमक्या त्याच काळात म्हणजे १ ऑगस्ट नंतर आपल्याकडे महाराष्ट्रात शेतीसाठी लाभदायी पाऊस होत असतो. आणि त्याचवेळेस त्याची अवश्यकताही असते. नेमक्या त्या पावसासाठी जर एल-निनो ह्यावर्षी कार्यरत झाला तर पाऊस होण्याच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते. तसेही आतापर्यंतच्या निरीक्षणावरून अलीकडच्या १०-१५ वर्षात अंदाजे सुरवातीचे ३०-४० दिवस मान्सूनचे आगमन उशिरा होणे, अला तरी त्याचा प्रवाह कमकुवत जाणवणे, अश्या घडामोडीतून महाराष्ट्रात पाऊस विशेष झालेला दिसत नाही. म्हणजेच ह्यावर्षी एल निनोचा धोका व नेहमीचे मान्सून आगमन वर्तन पाहता आणि तसे घडले तर त्याच्या एकत्रित परिणामातून कदाचित संपूर्ण ४ महीनेही पावसासाठी मुकावे लागू शकते. म्हणजेच दुष्काळच सामना करावा लागू शकतो.
आणि समजा मान्सून आगमन वेळेवर झाले आणि त्यातून तटपुंजा जलसाठा धरणात उपलब्ध झाला तर आधीच काटकसरीने शिल्लक धरून दुष्काळाशी सामना करायची वेळ आली तर मानवी व पशुधनाची पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला हातभार लागू शकतो. तेंव्हा पाणी नियोजन आत्तापासूनच करावयास काय हरकत आहे.
परंतु असे असले तरी संपूर्ण ४ महिन्याच्या पावसाळी हंगामात आयओडी धन अवस्थेकडे झुकण्याची शक्यतेचे संकेतही जाणवू लागलेत. आणि तसे घडले आणि आयओडी तसा झुकला तर मग मात्र भारतासाठीच्या पावसासाठी त्याची ती अवस्था अनुकूलही ठरु शकते. म्हणजेच भारतासहित जगासाठी २०२३ ला जरी एल- निनो अवतारला तरी भारतासाठी धन आयओडी हा भारताचा ला- निना म्हणून २०२३ च्या मान्सून कालावधीत पाठीशी उभा राहू शकतो. म्हणून तर धन आयओडी हा भारतासाठीचा ला-निना मानला जातो. परंतु ह्याला अजुन खुप जर तरचे कंगोरे आहेत. नेहमीप्रमाणे ह्या संबंधीचे चित्र येत्या ३ आठवड्यात भारतीय हवामान खात्याकडून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आणि ह्याच एका शक्यतेवर काही जण ओरडू लागलेत. “ ह्यावर्षीही खूप पाऊस पडणार आहे.” ग्रामीण भागातील म्हणीप्रमाणे त्यांचे ‘ लागो भागो तीन टोले ‘. काहीही होवो, पण बोलून मोकळे व्हायचे !
ह्या एल-निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाशी जर सामना करतांना असेही विवेचन करावेसे वाटते की, राज्य जल आराखड्यात तापी खोऱ्यातील गुजराथ मधील उकाई धरणात वाहून जाणारे हक्काचे १०० टीएमसी पाणी अडवणे, अरबी समुद्रात वाहून जाणारे दमणगंगा, नारपार खोऱ्यातील पाणी दुष्काळी मराठवाडा व नाशिक जिल्ह्यात वळवणे, अप्पर कडवा सारख्या प्रकल्प राबवणे, त्यातील समस्या दूर करणे इ. गोष्टीला प्राधान्य सिंचन विभागाने द्यायला हवे, असे वाटते. कारण शेतीबरोबरच शहरी भागातही आजकाल दिवसेदिवस पिण्याच्या पाण्याची मागणी वाढतच आहे.
एल – निनोची साशंकता म्हणून हे जर आपण केले नाही तर एल-निनोच्या वर्षामध्ये कदाचित दुष्काळ व त्यातून राज्या-राज्यात होणारी भांडणे आणि ला -निनात येणारे महापूर व त्यातून होणारी जीवित वित्त-हानि हे काल-चक्र असेच चालूच राहणार. पिण्याच्या पाण्यासाठी ऐनवेळेस धावाधाव उपयोगी ठरणार नाही. नियोजनातीळ गाफिलपणा बुध्दिमान्यांची पलटण हाताशी असणाऱ्या भारताला हे नक्कीच लाजिरवाने ठरेल. म्हणून इतिहासातील जलदूत रेल्वेने पिण्यासाठी पाणी आणण्यासारखा अनुभव जमेस असतांना आणि ह्या द्रविडी प्राणायामाची पुनरावृत्ती थांबवायची असेल तर जलसंपदा विभाग व प्रशासनाने ह्या वर्षी पाण्याचा अपव्यय, अनावश्यक शेतीची आवर्तने ह्यावर कटाक्ष ठेवून कमी करणे व भविष्यातील पेयजलासाठी सावधानता बाळगणे गरजेचे वाटते. ह्यासाठी सिंचन कायद्याची सक्तपणे तसेच जल- शिवाराची अपूर्ण कामे पुर्ण होणेसाठीची अंमलबजावणी होणेही गरजेचे वाटते. ह्या निमित्ताने हेच आव्हान करावेसे वाटते.
माणिकराव खुळे
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Rainfall El Nino Drought Drinking Water Planning Article by Manikrao Khule