माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
…
१-उघडीप –
दसऱ्यानंतरच अपेक्षित उघडीप देण्याच्या शक्यतेंतला पाऊस, मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ वगळता, आजपासूनच, उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १८ जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेथे या १८ जिल्ह्यात पूर्णतः नव्हे परंतु काहीस्या उघडीपीची शक्यता असून, केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता सध्या जाणवते.
२-कोकण व विदर्भातील पाऊस-
मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यात मात्र दसऱ्या नंतरही तेथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते.
३- आगाऊ उघडीपीची शक्यता कश्यामुळे निर्माण झाली?
महाराष्ट्रावरून पाऊस पाडत सरकलेले हवेचे कमी दाब क्षेत्र आज सौराष्ट्रात पोहोचले असून पुढील २४ तासात ते अरबी समुद्रात उतरून पुन्हा तीव्र कमी दाबात रूपांतर होऊन ते ओमानकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
४-परतीचा पाऊस अजूनही जागेवरच स्थिर –
देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पर्यंत, वेरावळ भरूच उज्जैन झाशी शहाजहाणपूर या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील पाच दिवस अजूनही जाग्यावरच थबकण्याची शक्यता जाणवते.
५-शेतकामांना चालना मिळू शकते काय?
उघडीपीच्या शक्यतेमुळे कांदा बियाणे टाकणी, खरीपातील मका सोयाबीन बाजरी भुईमूग व अति आगाप धान सारख्या पीकांची काढणी, द्राक्षे-बाग छाटणी, वाफस्या नंतरच्या भाजीपाला पीक काढणी, हरबरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठीची रानं तयार करणे, इत्यादीसारख्या शेतकामांचा शेतकामांना चालना मिळू शकते, असे वाटते. अर्थात हवामान विभागाच्या अंदाजाचा कानोसा घेऊनच निर्णय घ्यावा, असे वाटते
६-अंदमानजवळील कमी दाबक्षेत्र वायव्येकडे सरकणार-
मंगळवार दि. ३० सप्टेंबर दरम्यान अंदमानजवळ बं. उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती व त्यानंतर त्याचे उत्तर व उत्तर मध्य भारताकडे त्याच्या मार्गक्रमणाच्या शक्यतेतून महाराष्ट्रात ८-९ ऑक्टोबर दरम्यानच्या झोडापण्या स्वरूपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाचा अपेक्षित धोका सध्या तरी कमी होईल, असे वाटते.
७- ह्या व्यतिरिक्त वातावरणात काही बदल झालाच तर सूचित केले जाईल.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.