इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांत कहर केला आहे. अनेक ठिकाणी पिकांसह माती खरडून गेली आहे. तर या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुढील दोन दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता राज्यात सरासरी किती पाऊस झाला याची आकडेवारी समोर आली आहे. तर अतिवृष्टीमुळं राज्यातले किती नागरिक स्थलांतरित झाले आहेत याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत ११७ टक्के पाऊस झाला आहे. कोल्हापुरातला ८५ टक्के आणि अमरावती, रायगड तसंच नाशिकमधला सुमारे ९५ टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १७० टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला. जळगावमध्ये सरासरीच्या १४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात १७६ मिलीमीटर तर मुंबई शहरात १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
तर अतिवृष्टीमुळं राज्यातले ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. सर्वाधिक १३ हजारांहून अधिक नागरिक सोलापूरात स्थलांतरित झाले आहेत. तर जालन्यात साडे ८ हजार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे ४ हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या २४ तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमध्ये २ आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे.