माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- आज १६ ऑगस्ट ते बुधवार २० ऑगस्ट पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
२- विशेषतः कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात व नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात या पाच दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीत ह्या आठवड्यात अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते.
३- पावसाची शक्यता कश्यामुळे?
i) हवेच्या कमी दाब क्षेत्राचा मान्सूनचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकल्या मुळे
ii) बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान ७.६ किमी. उंचीपर्यंतचे अस्तित्वात असलेले गोलाकार हवेचे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची वायव्येकडे मार्गक्रमणाच्या शक्यतेमुळे
ii)अरबी समुद्रात ३.१ किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्याची स्थिती-यामुळे पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
iv) ‘एमजेओ'(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) ची वि.वृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून १४ ते २० ऑगस्ट दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा ‘आम्प्लिटुड’ हा एक च्या आसपास आहे.
‘एमजेओ’ च्या या वारीचे जेंव्हा १४ ऑगस्टला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेंव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १४ ऑगस्टपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे. एमजेओ ची ही वारी बं. उपसागरात १७-१८ ऑगस्ट दरम्यान प्रवेशण्याची शक्यता असून मान्सूनच्या बं. उपसागरीय शाखेलाही त्यामुळे अधिक बळ मिळू शकणार आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.