माणिकराव खूळे, हवामानतज्ञ
….
१- पाऊस- रविवार दि. २५ ऑगस्टपर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.विशेषतः शनिवार दि.२४ ऑगस्टला नाशिक नंदुरबार धुळे जळगांव पुणे सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे रायगड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ह्या १६ जिल्ह्यात तर रविवार दि. २५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
२-उन्हाची ताप-i)अक्षवृत्तासमांतर दक्षिणोत्तर उतराईकडे जाणारा हवेच्या दाबाच्या ढाळा(प्रेशर ग्रेडीएन्ट)ची गैरहाजिरीतून व ii)आर्द्रतायुक्त पश्चिमी वाऱ्यांचा अभावातून आणि iii)वाढणाऱ्या १००६ हेक्टपास्कलपर्यंतचा एकजिनसी हवेचा दाबातून , सोमवार दि.२६ ते शुक्रवार दि. ३० ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची ताप उसळण्याची शक्यता जाणवते. तरीही दुपारनंतर पावसाची शक्यता ही आहेच.
३- पुन्हा पाऊस- शनिवार दि.३१ ऑगस्ट ते गुरुवार दि.५ सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबईत अश्या १६ जिल्ह्यात कदाचित एखाद्या-दुसऱ्या दिवशी तर जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
४-सप्टेंबरातील पावसांचे आवर्तने -सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान दिवसाचा व उष्णतेचा महिना असतो. मुंबईसह कोकणात १५, नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात १० ते १२, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याqत ५ ते ७ अश्या सरासरी पावसाळी दिवसाचा हा महिना असतो. ह्यावर्षी १ ते ५, व १२ ते १६ आणि २५ ते २९ सप्टेंबर अश्या प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात अंदाजे दहा ते बारा पावसाळी दिवसातून पावसाची तसेच
धरणे ओसंडून नद्या खळखळण्याची व विहिरी व जमीन पाणीपातळीत वाढीची अपेक्षा करू या!
५-कश्यामुळे हा सध्याचा पाऊस आहे?
i)मान्सूनचा मुख्य आसाचे पश्चिमी टोक सरासरी जागेच्या दक्षिणेला तर पुरवी टोक सरासरी जागेवर व
ii) मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन (एम.जे.ओ)ची चांगलीच साथ मिळत आहे, आणि शिवाय
iii)सध्याच्या उष्णतेच्या तापीची साथ होत आहे.
iv) बं. उपसागरात कमी दाब निर्मितीची शक्यता
या सर्वांच्या एकत्रित परिणामातून आजपासुन रविवार दि. २५ ऑगस्टपर्यन्त महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या भाकिताला अधिकची पूरकता वाढून मिळत आहे. अ. क्रं. ४ व ५ मधील माहिती ही इच्छुक शेतकऱ्यांच्या ह. साक्षरतेसाठी व प्रबोधनासाठीच समजावी.