पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशातून मॉन्सूनने खूपच उशिरा एक्झिट घेतली. मॉन्सून गेला असला तरी राज्यावरील पावसाचे सावट अजून कायम आहे. राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामाव खात्याने हा अंदाज वर्तवला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे दबाव वाढला आहे. याचा परिणाम संपूर्ण देशात पाहायला मिळणार आहे. आधीच ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे दक्षिण भारतात पाऊस आणि उत्तर भारतात कडाक्याची थंडी अशी स्थिती आहे. अशामध्ये आता चक्रीवादळ निर्माण होणार असल्यामुळे पुढच्या २४ ते ४८ तासांत वातावरणामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.