माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……
१- कथा महाराष्ट्रातील परतीच्या पावसाची-
परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारा जवळच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात दि.१४ ऑक्टोबरपर्यन्त दहा दिवस मुक्काम ठोकून होता.
परंतु, मंगळवार दि.१५ ऑक्टोबरला मात्र, मान्सून(परतीच्या पावसा)ने, महाराष्ट्राबरोबर सीमावर्ती मध्यप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक राज्यातून व संपूर्ण देशातून एका दिवसात निरोप घेतला. म्हणजे परतीचा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करतो-ना-करतो, तोच एका दिवसात तो महाराष्ट्रातून निघूनही गेला. थोडक्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस हा केवळ एका दिवसाठीच महाराष्ट्राला स्पर्श करून गेला असेच म्हणावे लागेल.
२-परतीच्या पावसाने एका दिवसातच का माघार घेतली?
दक्षिणेकडील चार राज्याच्या भागात म्हणजे दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, पॉंडिचेरी, काराईकल, तामिळनाडू केरळ ह्या भागात, बं. उपसागरातून वाहणाऱ्या बळकट वेगवान पूर्वीय वाऱ्यांच्या वातावरणीय प्रणाल्यातून गेल्या आठवड्यापासून तेथे ईशान्य मोसमी पूर्व भरपूर पाऊस पडतच होता. तेथील ह्या प्रणाल्यांच्या रेट्यातूनच, महाराष्ट्रा बरोबर, सीमावर्ती मध्यप्रदेश, दक्षिण छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकसहित राज्यातून व संपूर्ण देशातूनच आज दि. १५ ऑक्टोबरला परतीच्या पावसा(मान्सून)ने एका दिवसात हनुमान-उडी घेतली.
३-आता दक्षिणेकडील चार राज्यात होणाऱ्या ह्या मान्सूनच्या पावसाचे स्वरूप काय?
दि.१५ ऑक्टोबर पासूनच त्या चार राज्याच्या भागात आता नैरूक्त मान्सूनचे, ईशान्य मान्सून मध्ये रूपांतर झाले, म्हणजेच पुढील तीन महिन्यासाठी तेथील चार राज्यात नैरूक्त मान्सूनोत्तर हिवाळी पावसात म्हणजेच ईशान्य मान्सून चे तेथे आगमनच झाले असेच समजावे. महाराष्ट्रातही ह्यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते.
४-मग दि.२२ ते २६ ऑक्टोबर दरम्यानच्या पावसाच्या आवर्तनाचे काय?
ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील दि.२२ ते २६ ऑक्टोबर दरम्यानचे पावसाचे दुसरे आवर्तन त्याच्या नियोजित तारखेऐवजी ६ दिवस अगोदर म्हणजे दि.१६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.त्यातही विशेषतः २४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जाणवते. परंतु सध्या तेथे सध्या चालु असलेल्या शेतकामासाठी ह्या पावसाची विशेष भिती बाळगू नये, असेही वाटते.
विशेषतः मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ह्या २४ जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.