४ ऑक्सिजन प्लांट कार्यरत, ५२ प्रकल्पांना मंजूरी तर ३० प्रकल्प प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर
नवी दिल्ली – कोविड-19 विरोधातल्या लढ्यात भारतीय रेल्वे कोणतीही कसर ठेवत नाही आहे. एकीकडे रेल्वे, ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून देशभरातील विविध भागात प्राणवायू सुविहितपणे पोहचवत आहे. दुसरीकडे प्रवासी आणि मालवाहतुकीचे कर्तव्यही चोखपणे बजावत आहे. त्याचवेळी रेल्वेने आपल्या विभागा अंतर्गतच्या वैद्यकीय सुविधाही वाढवण्यावर भर दिला आहे.
देशभरातील रेल्वेच्या ८६ रुग्णालयांची क्षमता प्रचंड प्रमाणावर वाढवली जात आहे. या अंतर्गत, ४ प्राणवायू प्रकल्प कार्यरत आहेत, ५२ प्रकल्पांना मंजूरी दिली असून ३० प्रकल्प प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत. रेल्वेची सर्व कोविड रुग्णालये प्राणवायू प्रकल्पांनी सुसज्ज होणार आहेत.
प्राणवायू निर्मितीच्या प्रकल्पांबाबत २ कोटी रुपयांपर्यंतची मंजूरी देण्याचे अधिकार महाव्यवस्थापकांना दिले आहेत. रेल्वेने 4.5.21रोजी काढलेल्या M&P vide Rly Bd letter no 2020/F(X)II/ PW/3/Pt या आदेशानुसार हे अधिकार दिले आहेत. याशिवाय अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोविड उपचारासाठीच्या खाटांची (बेड्सची) संख्या २५३९ वरुन ६९७२ इतकी वाढवण्यात आली आहे. कोविड रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयू) खाटांची संख्या २७३ वरुन ५७३ इतकी वाढवण्यात आली आहे.
प्रगत व्हेंटिलेटर्सचा अंतर्भाव केला असून, त्यांच्या संख्येत ६२ वरुन २९६ पर्यंत वाढ केली आहे. रेल्वे रुग्णालयात अत्यावश्यक उपकरणांची उपलब्धता राहावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. यात BIPAP प्रणाली, ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर्स; ऑक्सीजन सिलिंडर्स यांचा समावेश आहे. कोविडग्रस्त कर्मचाऱ्यांना नोंदणीकृत रुग्णालयात गरजेनुसार प्राधान्याने दाखल करावे अशा सूचनाही रेल्वेने दिल्या आहेत. रेल्वे रुग्णालयांची ही प्रंचड क्षमता वृद्धी वैदयकीय आणीबाणीच्या काळात दिशादर्शक ठरणारी आहे