मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे हे माध्यम सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि सोयीचे आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास अगदी परवडणार्या दरात होत असल्यामुळे प्रवासी रेल्वेचा पर्याय सर्वात आधी निवडतात. खासगीकरण हा शब्द वापरत नसले तरी केंद्र सरकार खासगीकरणाचे धोरण अवलंबत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी रेल्वे विभाग खासगीकरणाच्या वाटेने निघाले आहे. त्याअंतर्गत आता रेल्वे प्रवाशांच्या खिशाला आता झळ बसण्याची शक्यता आहे.
रेल्वे विभाग आता प्रवाशांकडून स्टेशन डेव्हलपमेंट चार्ज (एसडीएफ) म्हणजेच स्थानक विकास शुल्क वसूल करणार आहे. स्थानकात गेल्यावर तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी वेगवेगळे शुल्क लागू होणार आहे. उपनगरीय आणि सिझन तिकिटे यातून वगळण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुविधा आणि विकास शुल्काच्या नावावर हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. पुनर्विकास होऊ घातलेल्या स्थानकांमध्येही हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्या प्रत्येक प्रवाशाकडून हे शुल्क वसूल केले जाणार आहे.
किती शुल्क द्यावे लागणार
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार, स्थानकातून रेल्वेत बसण्यासाठी १० ते ५० रुपयांपर्यंतचे अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार आहे. हे शुल्क युजर फिस तीन या श्रेणीतील असेल. वातनुकूलित श्रेणीसाठी ५० रुपये, शयनयान श्रेणीसाठी २५ रुपये, अनारक्षित श्रेणीत १० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. प्रवाशांना हे शुल्क वेगळे द्यायचे नाहीये, तिकीटाच्या शुल्कातून हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने हे शुल्क निश्चित केले आहे.
प्लॅटफॉर्म तिकीटही महाग
ही योजना लागू झाल्यानंतर फलाट तिकीटही १० रुपयांनी महाग होणार आहे. यावर जीएसटी द्यावा लागेल. रेल्वे स्थानकांचा नव्याने विकास पूर्ण झाल्यानंतरच हे शुल्क वसूल केले जाणार आहे. ही योजना कधी लागू होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे अधिकार्यांच्या माहितीनुसार, एसडीएफ लागू झाल्यानंतर महसूल सुनिश्चित होईल आणि रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासात निधी गोळा करण्यास मदत मिळेल. आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. पश्चिम मध्य रेल्वे विभागातील राणी कमलापती स्थानक आणि पश्चिम रेल्वे विभागातील गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.