नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे बाधित झालेल्या रेल्वे सेवेबाबत अखेर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठी घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पहिल्या लॉकडाऊन काळात प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यानंतर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. आताही या विशेष रेल्वे द्वारेच सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. या सर्व बाबीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग प्रादुर्भावापूर्वी सुरू असलेल्या वेळापत्रकाप्रमाणे देशभरातील सर्व रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.
सामान्य वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्हे आणि विभागांना जोडणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व गाड्या सुरू होणार असल्या तरी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या प्रवाशांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना या घोषणेचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल २० महिन्यानंतर सर्व रेल्वेगाड्या आता पूर्वीप्रमाणे रुळावर येणार आहेत.