नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात सवलत मिळते, देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ७५ वयोगटा पुढील जेष्ठ नागरिकांसाठी ही मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे रेल्वे विभागातर्फे देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येत होती, मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात ही सवलत बंद करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासात सवलत देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे.
भारतीय रेल्वे मंत्रालय हे प्रवाशांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट देण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील प्रवाशांना सवलतीची तिकिटे मिळू लागतील. ही सूट पूर्ववत न केल्याने रेल्वेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता रेल्वे पुन्हा एकदा ही सवलत सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी तथा जीवनवाहिनी मानल्या जाते. लाखो नव्हे तर कोट्यावधी नागरिक रेल्वेने दररोज प्रवास करतात.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हा निर्णय परत घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक नाराज झाले होते. पण लवकरच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत देण्यात येणार आहे. याविषयीच्या सवलतीबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. तसेच अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिकिटावरील शिथिलतेसाठी वयाचा निकष बदलण्यात येऊ शकतो. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरकारने सवलतीच्या भाड्याची सुविधा देण्यात यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
कोविड महामारीपूर्वी म्हणजेच मार्च २०२० च्या आधी, रेल्वेने ५८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना ५० आणि ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना ४० टक्के सवलत दिली होती. ही सवलत सर्व क्लासमध्ये रेल्वेने प्रवास करण्यासाठी उपलब्ध होती. पण कोरोनाच्या कालावधीनंतर गाड्यांची वाहतूक पूर्ववत झाल्यावर ही सुविधा बंद करण्यात आली. रेल्वेच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती.
दरम्यान, आता रेल्वे मंत्रालय लवकरच ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत देणार आहे. रेल्वे वरिष्ठ नागरिकांना पुन्हा प्रवास सवलत देणार आहे. पण यामध्ये रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांच्या वयामध्ये बदल करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. काही श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात ही सवलत मिळणार आहे. पूर्वी सर्व श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येत होती. तसेच रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याविषयीची योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार आहे. परंतु, सवलत देण्यात काही अटी घालण्यात येणार आहे. पण अद्याप याविषयीचे नियम आणि शर्ती तयार करण्यात आलेल्या नाहीत.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या भाड्यात ५३ टक्के सवलत देण्यात येते. यासोबतच दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. लोकसभेत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे प्रवासावर सवलत मिळण्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचे म्हणणे आहे की, वास्तविक ही सवलत ज्येष्ठांना सवलत देण्यासाठी दिली जात होती. रेल्वेने ही सुविधा पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. रेल्वे बोर्ड नागरिकांच्या वयोमर्यादेत बदल करण्यावर आणि ती वाढवण्यावर विचार करत आहे. अर्थात आता ही सुविधा फक्त साधारण वर्ग आणि स्लीपर वर्गासाठीच दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र ही सवलत पुन्हा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Railway Senior Citizens Ticket Concession