मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भंगार हा शब्द कुणालाही आवडत नाही, कधी कधी तर ती एक प्रकारची शिवी मानली जाते, परंतु काही वेळा आपल्याकडे पैसे नसेल तर घरातील भंगार विकून देखील आपल्याला पैशाची मदत होऊ शकते. आपण साधारणतः रेल्वेने प्रवास करतो, तेव्हा केवळ रेल्वे स्टेशनच नाही तर रेल्वे लाईनच्या आसपास अनेक ठिकाणी आपल्याला भंगार सामन, विशेषतः लोखंडी भंगार पडलेले आढळून येते, अनेक वर्ष हे सामान असेच गंज खात कुजलेले व सडत पडलेले दिसून येते. परंतु आता रेल्वेने शून्य भंगार मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून रेल्वे आता मालामाल होत आहे.
भंगार विक्रीतून साधारणपणे एखादी संस्था किती कमाई करु शकते? अंदाज तर बांधून पहा. फार फार तर एक कोटी अथवा त्याहून थोडी जास्त रक्कमेचा अंदाज बांधू शकाल. पण पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून किती कमाई केली हे ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम रेल्वेने सध्या शून्य भंगार मोहिम सुरु केली असून परिसर स्वच्छ करण्यावर पश्चिम रेल्वे भर देत आहे.
या योजनेतून पश्चिम रेल्वेने गेल्या 6 महिन्यांत तब्बल 150 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. तर भारतीय रेल्वेने 10 ऑगस्ट पर्यंत 200 कोटी रुपये महसूल गोळा केला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 6 महिन्यांत भंगार विक्रीतून 150 कोटीपेक्षा जास्त कमाई झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे हा चालू वर्षात 6 महिन्यांच्या कालावधीतील 150 कोटीं रुपये महसूल गोळा करणारा पहिला झोन ठरला आहे.पश्चिम रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी पश्चिम रेल्वेने शून्य भंगार मोहीम सुरु केली आहे.
पश्चिम रेल्वेने सर्व विभागातून चालू वर्षात एप्रिल ते जुलै 2022 दरम्यान, भंगाराच्या विक्रीतून 151.75 कोटी रुपयांच्या महसूलाची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या विभागाने भंगार विक्रीतून 88.91 कोटी रुपयांची कमाई केली होती. याची तुलना केली असता, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेने 88 टक्के अधिक कमाई केली आहे. या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 150 कोटी रुपयांचा मोठा टप्पा ओलांडणारा पहिला झोन बनण्याचा मान भारतीय रेल्वेत पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.
भंगाराची विल्हेवाट लावून पश्चिम रेल्वे केवळ महसूलच गोळा करत आहे असे नव्हे तर त्यामुळे रेल्वेचा मोठा परिसर स्वच्छ होणार आहे. तसेच ही जागा दुसऱ्या चांगल्या उपक्रमासाठी ही वापरता येणार आहे. या योजनेमुळे परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. झिरो स्क्रॅप मिशनचा एक भाग म्हणून,पश्चिम रेल्वेच्या सर्व विभाग आणि विविध डेपोवर भंगारविक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने 513.46 कोटी रुपयांचे भंगार विक्री केली आहे. त्यामुळे यापुढे रेल्वेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसेल.
Railway Scrap Mission Earn Crore Money