अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका हॉलिवूडपटात आपण बघितले आहे की, आकाशात उडणाऱ्या विमानामध्ये अचानक खूप सारे साप येतात आणि त्यानंतर प्रवाशांची कसरत सुरू होते. भारतीय रेल्वेही यात मागे नाही. रेल्वेमध्ये साप आढळण्याच्या अनेक घटना भारतात पुढे आल्या. आता तर ट्रेनमध्ये विंचू निघाल्याची एक घटना उघडकीस आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अमरावती-जबलपूर ट्रेन आपल्या प्रवासाला निघाली होती. सारे प्रवासी आरामात प्रवास करत होते. कुणी झोपले होते, कुणी मोबाईलवर होते तर कुणी गप्पा मारत होते. अशात एक प्रवासी अचानक झोपेतून जागा झाल्यासारखा उठला आणि इकडे तिकडे बघू लागला. त्याने काही वेळाने आपला पाय पकडला आणि सीटच्या खाली बघायला लागला. त्याला काहीतरी चावल्यासारखे वाटले म्हणून त्याने सहप्रवाश्यांना सांगितले. सगळे लोक खाली शोधाशोध करू लागले. त्या अख्ख्या डब्यामध्ये नेमके काय चावले ही एकच चर्चा होती.
थोड्यावेळाने एकाला तिथे तपकिरी रंगाचे काहीतरी वळवळताना दिसले. तेव्हा विंचवाने चावा घेतल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्या माणसाची प्रकृती बिघडत चालली होती. तो अस्वस्थ होऊ लागला होता. लोकांनी लगेच विंचवाला बाहेर फेकले आणि टीटीला संपर्क साधला. थोड्या वेळात नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. मुलताई आणि आमला या स्थानकादरम्यान गाडी धावत होती. त्यावेळी बैतूल स्थानकावर गाडी थांबवून रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि प्रवाशाला रुग्णालयात पाठविण्यात आले.
होशंगाबादचा रहिवासी
होशंगाबादच्या पिपरिया येथील रहिवासी सुनील कुमार सिंदे हे अमरावती जबलपूर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. रात्रीचा वेळ असल्यामुळे विंचू लवकर दिसला नाही. त्यामुळे प्रवाशांनी लाईट सुरू केले आणि शोधाशोध केली. जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.