नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज नाशिक येथील रेल्वे सुरक्षा दल विभागीय प्रशिक्षण केंद्रात, दलाच्या (आरपीएफ) 40 व्या स्थापना दिवस संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात, केंद्रीय मंत्र्यांनी 2023 आणि 2024 मध्ये प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करण्यासाठी तसेच असामान्य सेवा बजावण्यासाठी प्रतिष्ठित पोलीस पदके आणि जीवन रक्षा पदके मिळालेल्या रेल्वे संरक्षण दलातील 33 जवानांचा सत्कार केला.
सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सक्रिय अवलंब केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे सुरक्षा दलाची प्रशंसा केली. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल बुलेटप्रूफ जॅकेट आणि सुधारित हेल्मेटसह प्रगत संरक्षणात्मक प्रणालीने सुसज्ज असेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या शिवाय, मंत्र्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करून रेल्वे सुरक्षा दलाच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रांचे अद्यतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 35 कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. विशेष प्रशिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने तामिळनाडूमधील रेल्वे संरक्षण दलाच्या श्वान पथकाच्या क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्रासाठी 5.5 कोटीं रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे सुरक्षा दल संचलना दरम्यान औपचारिक सलामी स्विकारली. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अश्विनी वैष्णव यांनी ‘संज्ञान’ या दलातील परस्पर संवाद वाढवणाऱ्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या हिंदी आवृत्तीचा प्रारंभ केला. रेल्वे संरक्षण दल कर्मचाऱ्यांचे कायदेशीर ज्ञान बळकट करण्याच्या उद्देशाने, नव्याने लागू करण्यात आलेल्या तीन फौजदारी कायद्यांवरील संदर्भ पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या देखील वैष्णव यांच्या हस्ते जारी करण्यात आल्या.
उपस्थितांना संबोधित करताना वैष्णव यांनी आज नवा आकार घेत असलेल्या भारतीय रेल्वेच्या मोठ्या परिवर्तनामध्ये मार्गदर्शक आणि प्रेरणादायी शक्ती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. गेल्या वर्षभरात 5300 किमी नवीन रेल्वे मार्ग आणि गेल्या 10 वर्षात 31,000 किमी नवीन रेल्वे मार्ग झाल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 10 वर्षात 40,000 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे, जे गेल्या 60 वर्षांच्या तुलनेत दुप्पट आहे, असेही वैष्णव यांनी सांगितले.
देशातील सर्व लोकांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कवच सारख्या आधुनिक सुविधांसह वंदे भारत आणि अमृत भारत सारख्या नवीन काळातील गाड्यांद्वारे चांगला, आरामदायी, जलद आणि परवडणाऱ्या दरात रेल्वे प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचा भारतीय रेल्वेचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांच्या सोयीसाठी सध्या सुमारे 12,500 सामान्य श्रेणीचे डबे तयार केले जात आहेत, असेही ते म्हणाले.