मुंबई – सर्व प्रकारच्या रेल्वे पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, रेल्वेचे भाडेही कमी होणार आहे. त्यामुळे अनेक जण रेल्वे तिकीटाचे बुकींग करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या बुकींसाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. ती नेमकी काय हेच जाणून घेणार आहोत.
कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंदे, व्यवसाय, खासगी कंपन्यांसह सरकारी कामकाजावरही विपरित परिणाम झाला होता. त्यामध्ये एसटी आणि रेल्वेसेवेचाही समावेश होता. या काळात संपूर्ण रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. परंतु कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर सर्व सेवा रुळावर येत असताना रेल्वेसेवाही रुळावर येत आहे. दुसर्या लाटेनंतर कोरोना निर्बंधांमुळे रेल्वेच्या विशेष गाड्या धावत होत्या. आता विशेष गाड्या थांबवून कोरोनापूर्वीची सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत त्यासंदर्भात रविवारी मंत्रालयाकडून एका विशेष सूचनेचे परिपत्रक काढले आहे.
आगामी सात दिवसांपर्यंत रेल्वे तिकीट आरक्षित करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कोविडमुळे विस्कळित झालेली रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वेची आरक्षण प्रणाली (पीआरएस) एक आठवड्यापर्यंत रात्री सहा तास बंद राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरक्षण प्रणालीतील सुधारणेची प्रक्रिया १४-१५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन ती २०-२१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत समाप्त होणार आहे. यादरम्यान रात्री ११.३० वाजेपासून सकाळी ०५.३० वाजेपर्यंत पीआरएस सेवा (तिकीट आरक्षण, वर्तमान बुकिंग, तिकीट रद्द करणे इ.) उपलब्ध असणार नाही. पीआरएस सेवा वगळून १३९ सह चौकशी सेवा पूर्णवेळ सुरू राहील. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंचे ‘विशेष’ टॅग हटवण्याचे तसेच महामारीपूर्वीच्या भाड्यावर तात्काळ परतण्याचे आदेश दिले होते.