इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उंदरांच्या त्रासाने वैतागलेली सरकारी कार्यालये यातून मार्ग शोधण्यासाठी बरेच उपाय करीत असतात. कारण एखाद्या प्रकरणाची फाईल उंदराने कातरली तर सरकारवर येणारे संकट मोठे असते. पण उंदरांना पकडण्यासाठी तरी किती खर्च करावा, याचा काहीतरी नेम असायला हवा ना? उत्तर प्रदेशमध्ये लखनऊमधील एका सरकारी विभागाने मात्र त्याची मर्यादाच ओलांडली आहे.
लखनऊमधील या विभागात खूप उंदरं आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी दरवर्षी वेगळी आर्थिक तरतूद करावी लागते. पण या खर्चावर काहीतरी मर्यादा असावी किंवा उंदरं पकडण्यात यश तरी यावं. पण असे काहीच नाही. या सरकारी विभागाने ३ वर्षांत अवघे १६८ उंदीर पकडले आहेत आणि एक उंदीर पकडायला तब्बल ४१ हजार रुपये खर्च केले आहेत. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असल्यामुळे उंदरांचे महत्त्व वाढले आहे, हे खरे आहे. पण एका उंदराला पकडण्यासाठी एवढा खर्च यावा, हे जरा अतीच झाले.
उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागाने रेल्वे स्थानकावर फिरणारे उंदीर पकडण्यासाठी एकूण ६९ लाख रुपये खर्च केले. आश्चर्याची बाब म्हणजे ६९ लाख रुपये खर्च करून त्यांना केवळ १६८ उंदीर पकडण्यात यश आलं. म्हणजे एक उंदीर पकडण्यात सुमारे ४१ हजार रुपये खर्च केले. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. २०२० मध्ये उंदीर पकडण्यास सुरुवात झाली होती. उंदीर पकडण्याचं कंत्राट ‘सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन’ला दिलं होतं. या कंपनीने पहिल्या वर्षी ८३ उंदीर पकडले. त्यानंतर उंदीर पकडण्याचा सरासरी वेग कमी झाला. २०२१ मध्ये फक्त ४५ उंदीर पकडले. तर २०२२ मध्ये ४० उंदीर पकडले.
एकूण ६९ लाख रुपयांचा खर्च!
नीमच येथील रहिवासी असणारे आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वेने उंदीर पकडण्यासाठी किती रक्कम खर्च केली? याची माहिती मागितली होती. उत्तर रेल्वेचे दिल्ली, अंबाला, लखनऊ, फिरोजपूर आणि मुरादाबाद असे ५ विभाग आहेत. या सर्व विभागांनी उंदीर पकडण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. लखनऊ विभागानेही याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी ६९ लाख रुपये खर्च करून केवळ १६८ उंदीर पकडल्याची माहिती दिली.
Railway Rat Mouse Kill Expenses Scam Government