इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रेल्वेचा प्रवास सुखकर मानला जातो. परंतु काही वेळा रेल्वेमध्ये देखील चोरीच्या घटना घडतात. वास्तविक पाहता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे म्हणजे आरसीएफचे जवान तैनात केलेले असतात. तरी चोरीच्या घटना घडतात. अशीच एक चोरीची घटना घडली असताना या प्रकरणी आरसीएफ जवानांना अटक करण्यात आली.
मगध एक्स्प्रेसमध्ये चंदीगड येथील एका व्यावसायिकाचे ५५ लाख रुपये हरवल्याप्रकरणी आरा आरपीएफ चौकीच्या दोन जवानांना अटक केली आहे. अवघ्या दहा हजार रुपयांच्या लोभापोटी एका चोरट्याला सहकार्य केल्याच्या आरोपावरून बक्सर जीआरपीने या जवानांना तात्काळ पकडून बक्सरला नेले. यामध्ये आरा आरपीएफमध्ये तैनात प्रेम कुमार आणि कामेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
चंदीगड येथे राहणारे पारस पोपलानी या महिन्यात जमीन खरेदी करण्यासाठी पाटण्यात आले होते, त्यासाठी पाटण्यातील जमीन व्यापाऱ्याला त्यांनी ५५ लाख रुपये दिले होते. मात्र, नंतर जमीन पसंत नसल्याने त्यांनी त्याचे पैसे परत मागितले. त्यामुळे पाटण्याच्या त्या जमीन व्यापाऱ्याने ५५ लाख रुपये एका बॅगेत टाकले आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी जितेंद्र कुमार यांच्यावर सोपवली. मात्र पारस पोपलानी यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत.
कारण इकडे पाटण्याहून सुरू झालेली ट्रेन बक्सर स्टेशनवर थांबताच रेल्वे सुरक्षा दलाचे दोन शिपाई आले आणि जितेंद्र कुमार यांच्याकडून पैसे भरलेली बॅग घेऊन निघून गेले. तिकडे व्यापारी पारस पोपलानी रेल्वे सैनिकांच्या भीतीने गप्प बसले. मात्र दुसऱ्या दिवशी या व्यावसायिकाने ट्विट करून रेल्वेला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जीआरपीला लेखी अर्ज दिला.
दिल्ली जीआरपीकडून अर्ज मिळाल्यानंतर बक्सर जीआरपीने गुन्हा नोंदवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र कुमारला पाटणा येथून आधीच अटक केली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या त्या दोन्ही जवानांना देखील अटक करण्यात आली.