मनमाड – मनमाड लोहमार्ग पोलीसांनी सप्टेंबर २०२१ पासून म्हणजे आठ महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, पैसे व इतर वस्तू फिर्यादी यांना त्यांचे राहते पत्त्यावर मुंबई, पुणे या ठिकाणी घरी नेऊन परत केला. तर काहींना पोलीस ठाण्यात बोलावून देण्यात आला.लोहमार्ग औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड दीपक काजवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल परत करण्यात आला. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही फिर्यादी यांना प्रवासाचे पैसे वाचावेत म्हणून कुरियर द्वारे मुद्देमाल त्यांचे घरी पाठवण्यात आले तर काही फिर्यादी यांच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यात आले.
पुणे येथील फिर्यादी भारती अरूण ठोकळे यांची काजीपेट एक्सप्रेस मध्ये चोरी झालेली होती. त्यांचे चोरी झालेले ६ लाख ८० हजार रुपयांचे दागिने व मोबाईल पोलिसांनी ताबडतोब जप्त करून त्यांना परत केले. त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पुष्पगुच्छ व पेढे देऊन आभार व्यक्त केले. तर काही फिर्यादी यांनी त्यांचे मोबाईल लॅपटॉप वेळेत परत मिळाल्यामुळे त्या मध्ये असलेला डाटा त्यांना परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन लोहमार्ग पोलिसांवर आभार मानले.केरळ येथील फिर्यादी कला धरण पद्म कुमार आठ लाख चोवीस हजार रुपये किमतीचे कॅमेरे चोरीला गेले होते सदरचे कॅमेरे चार दिवसाच्या जप्त करण्यात आले. तेही परत करण्यात आले.
२०२१ मध्ये एकूण चोरी गेलेल्या ९१ लाख ९९ हजार १२० रुपयाच्या मालमत्तेपैकी ३१ लाख २१ हजार ९३० रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड पोलीस उपनिरीक्षक मधुकर लोखंडे , मोहरीर पोलीस हवालदार गोविंद दाभाडे, अंबादास जाधव दिनेश पवार पोलीस नाईक अमोल खोडके, किशोर कँडले, पोलीस अंमलदार विलास डोंगरे, राकेश सागर यांनी पार पाडली.
येथे करा तक्रार
लोहमार्ग पोलिसांच्या वतीने सर्व रेल्वे प्रवाशांना त्यांच्या चोरी व इतर तक्रारी बाबत पोलिसांना तात्काळ संपर्क करून तक्रारी द्याव्यात व वेळेअभावी तक्रार देता आली नाही तर महाराष्ट्र पोलिसांचे ऑनलाइन पोर्टल( www.mahpolice.gov.in ) वर जाऊन देखील तक्रार देऊ शकता असे पोलिसांनी आवाहन केले आहे.