विशेष प्रतिनिधी, मुंबई
एक एक्स्प्रेस वेगाने येत असताना रूळावर अपघाताने पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी एक तरुण धावत येऊन त्याला एखाद्या सुपरहिरोप्रमाणे वाचवतो आणि त्याच्या दिव्यांग आईकडे सोपवतो. वांगणी येथील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रेल्वे विभागात पॉइंटमन म्हणून काम करणारा तरुण मयूर शेळके सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरत आहे. जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावर सायंकाळी पाचच्या सुमारास एका दृष्टिहीन दिव्यांग आईसोबत सहा वर्षांचा मुलगा प्लॅटफॉर्मवर चालत होता. चालताना तोल जाऊन तो रेल्वे रूळावर पडला. त्याच वेळेदरम्यान उदयन एक्स्प्रेस वेगाने येत होती. त्या मुलाची आई मुलगा कुठे पडला हे चाचपडत होती. रेल्वे येत असल्याचे पाहून मुलगा प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करू लागला.
परंतु प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने त्याला चढता येत नव्हते. ही बाब ओळखून तिथे तैनात असलेल्या पॉइंटमन मयूर शेळके याने क्षणाचाही विलंब केला नाही. रेल्वे काही सेकंदाच्या अंतरावर असताना त्याने प्राणाची बाजी लावत मुलाला प्लॅटफॉर्मवर उचलून ठेवले. आणि स्वतः प्लॅटफॉर्मवर वेगाने चढला. काही सेंकंदाचा थरार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/rajtoday/status/1386723750201102336
रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ ट्विटर हँडलवर पोस्ट केला आणि लिहिले, परोपकारी ः मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावर पॉइंटमन मयूर शेळके यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवले. मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. आम्ही त्यांच्या धाडसाला आणि कर्तव्यदक्षतेला सलाम करतो.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीसुद्धा मयूर शेळके याच्या कार्याचे कौतुक केले आहे. कर्तव्यावर असताना आपल्या कार्याद्वारे मानवतेला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल. त्यांच्या कामगिरीचे मोल बक्षीस किंवा पैशात करता येणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/RailMinIndia/status/1384530815887974404