नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हे नवे वर्ष भारतातील प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाची भेट देण्यासाठी सज्ज झाले आहे. केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बसण्याची आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे याच प्रकारच्या प्रवासाचा अनुभव लांब पल्ल्याच्या रेल्वे गांड्यांद्वारा घेण्याची सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध करून देणार आहे.
याच अनुषंगाने सुरू केल्या जाणार असलेल्या शयनयान (sleeper) सुविधायुक्त वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या गेले तीन दिवस असंख्य चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीने ताशी 180 किलो मीटर वेग गाठला आहे. लवकरच या रेल्वे गाडांची सुविधा देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्याआधी या महिन्याच्या अखेरपर्यंत या चाचण्या सुरूच राहणार आहेत.
या चाचण्यांपैकी भारतीय रेल्वेच्या कोटा विभागात घेतल्या गेलेल्या यशस्वी चाचणीची ध्वनिचित्रफित केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवरून सामायिक केली असून, त्यात त्यांनी वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीचा वेगही नमूद केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सामायिक केलेल्या या ध्वनिचित्रफितीमध्ये वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीत एका आसना शेजारच्या टेबलस्वरुप सपाट पृष्ठभागावर पाण्याने जवळपास भरलेला ग्लास असून, त्या शेजारीच एक मोबाईल हँडसेट देखील आहे. या मोबाईलमध्येच वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीने वेगाने जात असताना, ताशी 180 किलो मीटर इतकी सर्वोच्च वेगाची पातळी गाठल्याचे दिसते. मात्र अशावेळी देखील तो पाण्याने भरलेला ग्लास मात्र तसाच स्थीर असल्याचे या ध्वनिचित्रफितीत स्पष्टपणे दिसते. काल 2 जानेवारी रोजी वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीची सलग तिसऱ्या दिवशीची यशस्वी चाचणी पूर्ण झाली. या चाचणीमध्ये वंदे भारत शयनयान रेल्वे गाडीने पूर्ण भाराच्या क्षमतेमध्ये यशस्वीरित्या सर्वोच्च वेग गाठला.
या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर रेलवे सुरक्षा आयुक्त द्वारे कमाल वेगाबाबत गाडीचे मूल्यांकन केले जाईल. अंतिम टप्प्यात यशस्वी झाल्यानंतरच , वंदे भारत गाडयांना अधिकृतपणे प्रमाणित केले जाईल आणि भारतीय रेल्वेत सामील केले जाईल.