अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रेल्वेचा प्रवास प्रवाशांना अनेक बाबतीत सोईस्कर वाटत असतो. लांबचा प्रवास करण्यासाठी तर अनेक प्रवासी रेल्वेला विशेष पसंती देतात. विमानापेक्षा अधिक सोईसुविधा रेल्वेत प्रवाशांना मिळतात. त्यातलीच एक सुविधा म्हणजे आपल्यासोबत भरपूर सामान रेल्वे प्रवासात नेता येतं. आता मात्र या सुविधेवर रेल्वे प्रशासनाने निर्बंध आणायचे ठरवले आहे. प्रवाशांना आता मर्यादित सामानच आपल्यासोबत प्रवासात नेता येईल. रेल्वे मंत्रालयाने तशी माहिती दिली आहे.
“प्रवास करताना सोबत जास्त सामान ठेवलं तर प्रवासाचा आनंद कमी होतो. त्यामुळे खूप सामान घेऊन प्रवास करु नका. तरीही सामान जास्त असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामानाची पूर्वनोंदणी करा”, अशा आशयाचे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे. या ट्विटनंतरच याविषयी चर्चा रंगली. शिवाय काही सामानावर बंदी आहे त्याबाबतीतही पुन्हा अधोरेखित करण्यात आले. स्टो, गॅस सिलेंडर, ज्वलनशील रसायन, फटाके, एसिड, चामडे, कातडे, पॅकेज केलेले तेल, तूप, दुर्गंधीयुक्त वस्तू, यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रतिबंधित वस्तू प्रवाशांनी सोबत बाळगल्या तर त्यांना रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गत कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय रेल्वेने सामानाचे जे नियम जाहीर केले आहेत त्यानुसार, ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना ४० ते ७० किलो सामान नेता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सामान प्रवाशांनी सोबत बाळगलं तर तिकिटाबरोबर सामानाचे वेगळे पैसे द्यावे लागणार आहे. रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन ठरत असते. हे वजन किती त्यानुसार प्रवाशांकडून सामानाचे भाडे आकारले जाईल. या नियमानुसार स्लीपर क्लासमध्ये ४० किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात. तर एसी डब्यात ५० किलो सामान नेण्याची सूट देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त सामान असेल तर अतिरिक्त भाडे मोजावे लागू शकतो.