नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून डिजीटल व्यवहारांना चालना दिली जात आहे. त्यातच गेल्या काही वर्षात ऑनलाईन तिकीट बुकींगमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याची दखल घेत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ऑनलाईन तिकीट बुकींगची मर्यादा वाढविली आहे. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढवली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे याआधी एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येत होती मात्र नव्या नियमानुसार, ही मर्यादा 12 तिकिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे आता एका महिन्यात 12 ऐवजी 24 तिकिटे काढता येऊ शकतील. अर्थात या तिकिटांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांपैकी कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांकद्वारे पडताळणी केली जाईल असे रेल्वेने म्हटले आहे.
सध्या रेल्वे विभागाचे आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच ॲप यांचा वापर करून आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येतात आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 12 तिकिटे काढता येतात आणि यातील कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांक वापरून पडताळणी केली जाते.









