नवी दिल्ली – रेल्वे कुठे आणि कशी थांबवायची याचे काही नियम आहेत. ती कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे किंवा नाही हे निघण्यापूर्वीच ठरलेले असते. परंतु इंग्लंडमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये रेल्वे एका स्थानकावर थांबलीच नाही. त्यामुळे प्रवाशांनी एकच गोंधळ केला. या गोंधळात रेल्वेचालकाला रेल्वे थांबवावी लागलीच शिवाय रिव्हर्स गेअर टाकून संबंधित रेल्वे स्थानकावर रेल्वे परत आणावी लागली.
डेली मेलच्या वृत्तानुसार, पेनजेंस येथून पॅडिंगटन येथे ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या एका रेल्वेचे स्विंडोन या स्थानकावर थांबण्याचे नियोजन होते. परंतु ही रेल्वे न थांबता पुढे गेली. रेल्वेची वाट पाहणारे प्रवासी हैराण झाले. रेल्वेत बसलेले प्रवासी सुद्धा संतप्त झाले. रेल्वे थांबेल आणि नियोजित स्थानकावर परतेल, असे अनेक प्रवाशांना वाटले. पण तसे काहीच झाले नाही. संतप्त प्रवाशांनी रेल्वेचा आपत्कालीन अलार्म ऑन केला. रेल्वे मात्र थांबलीच नाही. प्रवाशांनी रेल्वेतच गोंधळ घातला आणि आपत्कालीन आलार्म वाजवत राहिले. स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांनी सुद्धा निदर्शने करण्यास सुरुवात केली.
रेल्वेमधील प्रवाशांनी अनेक वेळा अलार्म वाजवल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपसात चर्चा केली. त्यानंतर रेल्वे चालकाने रेल्वे माघारी घेण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळानंतर अखेर नियोजित स्थानकावर रेल्वे परतली. यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. असे प्रकरण प्रथमच घडल्याचा दावा करण्यात येत आहे.