मुंबई – सुमारे दीडशे वर्षात भारतीय रेल्वेने अत्यंत प्रगतीशील कामगिरी केली असून भारताच्या विकासात रेल्वेचे रेल्वेचा मोठा वाटा आहे. सहाजिकच भारतीय रेल्वेला देशाची रक्तवाहिनी म्हणून संबोधले जाते. देशाची अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये आणि वेग वाढवण्यासाठी रेल्वे व्यवस्थेचे नेहमीच मोठे योगदान राहीले आहे. भारतीय रेल्वे आता हायड्रोजन तंत्रज्ञानावर आधारित गाड्या चालवण्याची तयारी करत आहे.
भारतात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी भारतीय रेल्वे व्यवस्था देखील एक महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून रेल्वे व्यवस्था सुधारण्यासाठी आणि ती अधिक सोयीस्कर करण्यासाठी सरकार अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. यामध्ये खासगी गाड्या चालवणे, रेल्वे स्थानकांचे खाजगीकरण यासारख्या काही पावले अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या प्रयत्नांतर्गत रेल्वे विभाग आता हायड्रोजन तंत्रज्ञानाने नवीन गाड्या चालवण्याची तयारी करत आहे.
सदर नवा कार्यक्रम यशस्वी करण्यास रेल्वेने विविध गुंतवणूकदारांनाही या प्रकल्पावर निविदा तथा कंत्राट बोली लावण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारतीय रेल्वे उत्तर रेल्वे अंतर्गत 89 किलोमीटर लांब सोनीपत-जींद मार्गावर डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (डीईएमयू) वर रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाद्वारे हायड्रोजन इंधन आधारित सेल वापरण्याची योजना आखत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेने विविध गुंतवणूकदारांकडून निविदा मागवल्या आहेत.
एक निवेदन जारी करून रेल्वेने म्हटले आहे की, डिझेल इंजिनवर चालणाऱ्या डीईएमयूचे पुनर्वितरण करणे आणि त्याला हायड्रोजन इंधनयुक्त रेल्वे संचामध्ये रूपांतरित केल्यास केवळ 2.3 कोटी रुपयांची बचत होणार नाही, तर दरवर्षी 11.12 कोटीची बचत होईल. तसेच कार्बन उत्सर्जन देखील कमी होऊ शकते.