नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रेल्वेचा प्रवास हा अन्य वाहनांपेक्षा सुखकारक आणि आरामदायी मानला जातो. अलीकडच्या काळात रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. परंतु रात्रीच्या वेळी प्रवास करताना आपले इच्छित स्टेशन चुकणार किंवा निघून तर जाणार नाही ना? या चिंतेत अनेक प्रवाशांना झोप लागत नाही, मात्र यापुढे असे घडणार नाही यासाठी रेल्वे विभागाने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे, त्यामुळे तुम्ही निर्दास्त झोपू शकता आणि आपले स्टेशन आल्यावर रेल्वेचे कर्मचारीस याबाबत माहिती देतील.
रात्री रेल्वेने प्रवास करत असताना IRCTC ने प्रवाशांसाठी ही नवीन सेवा सुरु केली असून आता त्यामुळे प्रवाशांची झोप तर पूर्ण होईलच. पण त्याला इच्छित स्थळी ही उतरता येईल. IRCTC तुमचे स्टेशन येण्याअगोदर अलर्ट करेल. त्यामुळे झोप तर पूर्ण होईलच पण तुमचे स्टेशनही चुकणार नाही. डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म असे रेल्वेने सुरू केलेल्या या विशेष सेवेचे नाव आहे. त्याकरिता रेल्वेच्या १३९ क्रमांकाच्या चौकशी सेवेवर प्रवाशाला त्यासाठी माहिती द्यावी लागेल. वेकअप अलार्मविषयीची सेवा त्यांना घेता येईल. ही सेवा रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत उपलब्ध असेल. तुम्ही ही सुविधा घेतल्यास, सेवेअंतर्गत स्टेशनवर तुमच्या आगमनाच्या २० मिनिटे आधी तुम्हाला अलर्ट मिळेल. या सेवेसाठी तुम्हाला फक्त ३ रुपये मोजावे लागतील.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रथम तुम्हाला IRCTC हेल्पलाइन १३९ वर कॉल करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पीएनआर क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेशनच्या २० मिनिटे आधी वेकअप अलर्ट मिळेल. दिवसभर काम, मानसिक ताण यामुळे अनके प्रवाशांना गाढ झोप लागून ते अनेक किलोमीटरवरील पुढच्या स्टेशनवर जागे व्हायचे. झोपेमुळे त्यांना पुन्हा इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पुन्हा त्रास सहन करावा लागायचा. हा सगळा प्रकार रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या अनेकदा लक्षात आला. देशभरात अशा अनेक घटना घडल्या. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले.
आपल्या देशातील रेल्वेच्या थांब्यांवर कोणतीही रेल्वे फार वेळ थांबत नाही. अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणी उठल्यानंतरही सामानासह बाहेर पडणे शक्य नसते आणि अपघाताची शक्यताही वाढते. कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची समस्या तर विचारूच नका. त्यांची अवस्था सर्वात अवघड होते. त्यातच पुढचे रेल्वे स्थानक दूर असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व तणावामुळे प्रवाशांना बर्थ बुकिंगचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची झोप ही पूर्ण व्हावी आणि त्याचे स्टेशनही चूकू नये यासाठी रेल्वेने ही अलर्ट प्रणाली सुरु केली आहे. याचा फायदा आता रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.
Railway New Service Journey Sleep Station
Missed IRCTC Night Wakeup Alert