नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली सुविधा आता बंद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्र्यांंनी तसे जाहिर केले आहे. त्यामुळे यापुढे वाय-फाय इंटरनेट सेवा रेल्वे प्रवाशांना मिळणार नाही. वाढत्या दरामुळे ही सुविधा बंद करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेत झालेला खर्च पाहता खूपच कमी फायदा होत असल्याने योजना बंद करण्यात करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात दिली.
ते सांगतात, एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत हावडा राजधानी एक्स्प्रेसमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवेला सॅटेलाइट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु बँडविड्थ शुल्क अधिक असल्याने या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी जास्त खर्च लागण्याचा अंदाज होता. त्यामुळे ही योजना प्रभावी नव्हती. तसेच प्रवाशांसाठी इंटरनेट बँडविड्थची उपलब्धता मर्यादित स्वरूपात होती. त्यामुळे प्रकाल्पाला बंद करावे लागले. मात्र वाय-फाय इंटरनेटसाठी खर्चाचा अंदाज किती होता याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.
केंद्र सरकार रेल्वेमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करत आहे, असे माजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी २०१९ मध्ये म्हटले होते. यासाठी चार ते साडेचार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतीय रेल्वेकडून सहा हजारांहून अधिक स्थानकांवर वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही सुविधा रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमाच्या (पीएसयू) रेलटेलच्या मदतीने उपलब्ध करून दिली जात आहे.